
मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची बॅटिंग सुरु आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील हिंदमाता, सायन, दादर यांसारख्या सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तर दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल उशिराने सुरु आहे. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यासोबतच ईस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवेसह सर्व वाहतूक संथ गतीने सुरू आहेत. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जलमय रस्त्यांमुळे चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.
सध्या दक्षिण मुंबईत पावसाचा जोर अधिक पाहायला मिळत आहे. नरिमन पॉईंटवर ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. पावसाची संततधार आणि वाऱ्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने पाण्यातून मार्ग काढताना बंद पडत आहे. ज्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईतील फोर्ट परिसरात सर्वाधिक ७४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर बांद्रा ६२ मि.मी, मलबार हिल ६० मि.मी, लोअर परळ ५८ मि.मी आणि हाजी अली परिसरात ५७ मि.मी पवासाची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच ग्रँट रोड ४७ मि.मी, सांताक्रुझ ४७ मि.मी, दादर ४१ मि.मी, चर्चगेट ३८ मि.मी, अंधेरी ३३ मि.मी आणि मुंबई सेंट्रल परिसरात ३० मि.मी पवासाची नोंद झाली आहे. तसेच मुंबई उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतील बोरिवली परिसरात २८ मि.मी, वरळी २६ मि.मी, वांद्रे कुर्ला संकुल २५ मि.मी, वर्सोवा २३ मि.मी आणि दिंडोशीत २२ मि.मी असा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
कल्याण आणि डोंबिवली परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे पहाटे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने शहरात गारवा जाणवत आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. तर दुसरीकडे आज रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये सोमवारी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर कमी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच पुणे आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात, सातारा जिल्हा परिसरात आज ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
तसेच गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागपूर, विदर्भ परिसरात आज मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोमवार ते गुरुवार या चार दिवसांदरम्यान विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.