देवेंद्र फडणवीसांसोबतच्या लिफ्ट प्रवासानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद; म्हणाले…

Uddhav Thackeray Press Conference : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पेपर फुटीवरही उद्धव ठाकरे बोलेल आहेत. वाचा सविस्तर...

देवेंद्र फडणवीसांसोबतच्या लिफ्ट प्रवासानंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद; म्हणाले...
उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 27, 2024 | 1:39 PM

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र पाहायला मिळाले. सभागृहात जात असताना उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. या दोघांच्या लिफ्टमधील भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. असं असतानाच उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी उद्या मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पासह विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. विविध प्रश्नांवरून त्यांनी सरकारला घेरलं आहे.

अर्थसंकल्पावर भाष्य

उद्याचा घोषणांचा पाऊस पडेल. तो गाजर संकल्प असणार आहे. निधी खर्चच होणार नाही. घोषणा खूप झाल्यात. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो. गेल्या दोन वर्षातील घोषणांची किती पूर्तता झाली हे खरेपणाने सांगितलं पाहिजे. हे खोके सरकार आहे. महायुती सरकार आहे. हे डबल इंजिन सरकार आहे. ही महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे. राम मंदिराच्या गाभ्यात लिकेज झालं. पेपरही लिक होत आहे. यांना लाज लज्जा शरम नाही. आम्ही प्रश्न विचारले तर आमच्यावर आरोप करतात. आम्ही त्यांना काही प्रश्न विचारू. राज्यातील जीवाभावाचे प्रश्न विचारू. आताची जी परिस्थिती आहे, तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतंय. राज्याला कळतंय राज्यातील शेतकरी परिस्थिती भोगत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

चंद्रकांतदादांनी मला चॉकलेट दिलं. आता लोकांना चॉकलेट देऊ नका. आश्वासनाचं चॉकलेट देऊ नका. कुणीही यावं आणि गाजर दाखवू नका. जनता शहाणी आहे. उद्या काही घोषणा करणार असाल, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तिची अंमलबजावणी करायला देऊ नका. त्यांचं चंद्रपुरातील भाषण हिणकस होतं. माता भगिनींना शिव्या देणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकता अशा मंत्र्याला तुम्ही योजना राबवायला देऊ नका, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

पुणे ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया

पुणे ड्रग्ज प्रकरणावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. आम्ही त्यावर आवाज उठवणार आहे. पण सरकार सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे. सरकारला खेचायचं आहे. हे ड्रग्स येतात कुठून? राज्यातील केमिकल्सचे कारखाने हे सोर्स आहे का, उद्योगमंत्री काय करतात. उद्योगमंत्र्यांचे हे सोर्स आहे का या गोडाऊनचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे. ड्रग्स प्रकरणावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कुणाचेही सगे सोयरे असू द्या. विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे. आम्ही प्रश्न विचारतोय म्हणून तुमच्या काळात जास्त ड्रग्स सापडले असे फालतू उत्तर नको. त्याच्या मुळाशी जा आणि खणून काढा, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.