धक्कादायक, तो निर्दयी निघाला सिरियल कॅट किलर, सहा मांजरींची हत्या केल्याची दिली कबुली…
मांजरीला मारल्यानंतर काशीत सोन्याची मांजर दान करावी लागते अशा धार्मिक समजूती आहेत. तरीही एका निर्दयी व्यक्तीने लागोपाठ सहा मांजरींची निघृण हत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

मांजरी सारख्या कोणताही उपद्रव न करणाऱ्या मुक्या प्राण्याची निदर्यीपणे हत्या केल्याच्या प्रकरणात पांजरापोळ भागातून आरसीएफ पोलिसांनी एका निदर्यी व्यक्तीला सीसीटीव्हींच्या मदतीने अटक केली आहे. मात्र, हा इसम ‘सिरियल कॅट किलर’ निघाला असून त्याने ६ हून अधिक मांजरींची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ऑगस्ट पासून या भागात एका मांजरीच्या पिल्ला सह २० मांजरींची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. आता या सिरियल मांजर किलरने सहाहून अधिक मांजरी मारल्याची कबूली दिल्याने पोलिस आणि प्राणीमित्र हैराण झाले आहेत. मांजरीसारखा शांत प्राण्याची हत्या करण्यामागे या तरुणाची नेमकी मानसिकता काय असेल याची चर्चा सुरु आहे.
या प्रकरणात शिवा नावाच्या एका बेघर सडाफटीक व्यक्तीला सीसीटीव्हींच्या मदतीने आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. कामावाडी, पांजरापोळ आणि शनिमंदिर परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर या प्रकरणात या शिवा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात माहिती अशी ऑगस्ट अखेर पासून या भागात २० मांजरीची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. येथील मांजरींना जेवण घालणारी कॅट फिडर रुबीना पठाण हिला एकाच रात्री सहा मांजरींना कोणीतरी चाकूने भोसकून मारुन टाकल्याचे निदर्शनास आले होते.त्यानंतर तिने पेटा इंडिया संस्थेला आणि पोलिसांना या संदर्भात तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात सर्वत्र सीसीटीव्हींचा पडताळा केल्यानंतर या शिवा नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
पेटा इंडिया या संस्थेने या प्रकरणात या सिरियल कॅट किलिंग किंवा किलर प्रकरणात जो कोणी माहिती देईल त्याला ५० हजाराचे इनाम जाहीर केले होते. त्यानंतर आरसीएफ (RCF) पोलीस ठाण्यात बीएनएस (BNS) च्या कलम ३२५ आणि ‘प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६०’ च्या संबंधित कलमांनुसार एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला. शिवा याने या मुक प्राण्यांचा क्रूरपणे हत्या का केली, तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे का, याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
