Zeenat Aman: ‘सेक्स सिंबल’ टॅगवर झीनत अमान स्पष्टच बोलल्या, ‘त्या’ लेबलमागची महिला जी होती, ती…
Zeenat Aman: अनेक सिनेमांमध्ये बोल्ट भूमिका साकारत अभिनेत्री झीनत अमान यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे त्यांना 'सेक्स सिंबल' असा लेबल लोकांनी दिला. यावर अनेक वर्षांनंतर अभिनेत्री स्पष्टच बोलल्या आहेत... जाणून घ्या काय म्हणाल्या झीनत अमान?

Zeenat Aman: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांनी आपल्या सौंदर्याने एकेकाळी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. मोठ्या पडद्यावर आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या झीनत खऱ्या आयुष्यात मात्र सर्वांपेक्षा वेगळ्या आहे. अभिनेत्रीने आता स्वतःच्या प्रतिमेवर स्वतः मौन सोडले आहे आणि कॅमेऱ्यामागची ती खरी व्यक्ती कशी आहे, हे सांगितले आहे. सांगायचं झालं, सिनेमांमध्ये बोल्ड भूमिका साकारल्याने अभिनेत्रीला अनेकांनी ‘सेक्स सिंबल’ असा लेबल दिला. यावर झीनत अनेक वर्षांनंतर स्पष्ट बोलल्या आहेत. झीनत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सांगितलं आहे की, लोक त्यांना एक ग्लॅमर आयकॉन म्हणून पाहतात, पण खऱ्या आयुष्यात ती शांत आणि थोडी लाजरी आहे.
सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट करत झीनत अमान म्हणाल्या, त्यांना खासगी आयुष्यात अत्यंत शांत राहायला आवडतं. त्या स्वभावाने शांत आणि स्वतःच्या कामातच समाधान शोधणाऱ्या आहे. मोठ्या करियरमध्ये झीनत यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं. पण याचा अर्थ असा होत नाही की, त्या मोठ्या पडद्यावर जशा आहेत, तशाच खऱ्या आयुष्यात देखील असतील.
झीनत अमान यांनी आपल्या पोस्टमध्ये असं देखील म्हटलं आहे की, लोक सहसा एखाद्या व्यक्तीला त्याच्या खऱ्या ओळखीऐवजी स्वतःच्या अनुभवांच्या आणि विचारांच्या आधारे समजून घेतात. कोणाला एखादी व्यक्ती रहस्यमय वाटू शकते, तर दुसऱ्या कोणाला तीच व्यक्ती भयानक किंवा वेगळ्या स्वभावाची वाटू शकते. त्याचप्रमाणे, कधीकधी एखाद्या अज्ञातासमोरही मनुष्य मोकळेपणाने आपल्या मनातले बोलू लागतो.
झीनत अमान यांच्या मते, वेगवेगळे लोक एकाच व्यक्तीला स्वतःच्या दृष्टिकोनातून कसे पाहतात, हे पाहणं रंजक असतं. बऱ्याचदा लोकांनी बनवलेली मतं आणि एखाद्याचं खरं रूप यामध्ये खूप फरक असतो. झीनत अमान यांनी स्पष्ट केलं की, आता त्यांना स्वतःच्या ग्लॅमरस प्रतिमेबद्दल कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. प्रत्येकाला दुसऱ्या व्यक्तीला स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा अधिकार आहे, परंतु स्वतःला समजून घेणं आणि स्वतःच्या सत्यासोबत जगणं देखील तितकेच महत्त्वाचं आहे… असं देखील झीनत म्हणाल्या.
झीनत पुढे म्हणाल्या, कोणत्याही व्यक्तीची ओळख ही फक्त लेबल्स, फोटो, हेडलाईन्स किंवा इतरांनी तयार केलेल्या कथांपुरती मर्यादित राहता कामा नये. प्रत्येक व्यक्तीने या सर्वांच्या पुढे जाऊन स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या या पोस्टच्या शेवटी झीनत अमान यांनी चाहत्यांना एक प्रश्न देखील विचारला आहे. त्यांच्याबद्दल कधी कोणी चुकीचा ग्रह करून घेतला होता का किंवा त्यांनी स्वतः कधी पूर्णपणे न ओळखताच दुसऱ्या व्यक्तीला चुकीचे समजले होते का, हे त्यांना जाणून घ्यायचे होते.
अभिनेत्रीने म्हटले की, कदाचित प्रत्येकाकडे असे एक-दोन अनुभव नक्कीच असतील आणि त्यांना आपल्या चाहत्यांच्या या गोष्टी ऐकायला आवडेल. झीनत अमान यांची ही पोस्ट पुन्हा एकदा हीच आठवण करून देते की, एखाद्या व्यक्तीची सार्वजनिक प्रतिमा हीच त्याची संपूर्ण ओळख नसते. पडद्यावर ग्लॅमरस दिसणारी व्यक्ती खऱ्या आयुष्यात शांत आणि लाजरी देखील असू शकते. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आपण इतरांना केवळ त्यांच्या प्रतिमेवरून नाही, तर त्यांच्या वास्तवाला समजून घेण्याचा प्रयत्न करून पाहिले पाहिजे.
