Nitesh Rane: मग तुम्ही बाबरीजवळ असता तर हवेने उडून गेला असता; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

Nitesh Rane: वरूण सरदेसाईला सुरक्षेची गरज काय? यानं कधी मच्छर मारलाय का? पडळकर, सोमय्या आणि राणांवर हल्ले झालेत, असंही त्यांनी सांगितलं.

Nitesh Rane: मग तुम्ही बाबरीजवळ असता तर हवेने उडून गेला असता; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 15, 2022 | 5:19 PM

मुंबई: देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी बाबरीवर पाय जरी ठेवला असता तरी त्यांच्या वजनाने मशीद पडली असती, असं विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबरी आंदोलनातील सहभागाची खिल्ली उडवली होती. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर पलटवार केला आहे. काल ना पक्षप्रमुख होते, ना काल मुख्यमंत्री होते. भेदरलेला आणि घाबरलेला एक आजारी माणूस काल काहीही बडबडत होता. शिवसैनिकांची अक्कल ही गुडघ्यात असते हे चंद्रकांत खैरे बोलले. त्यांच खरंच कौतुक आहे. शिवसैनिकच असे असतील तर आता पक्षप्रमुखांची अक्कल कुठंय हे सांगायची गरज नाही, असा टोला लगावतानाच दुसऱ्यांबद्दल टिंगल टवाळी करता. तेव्हा स्वत:बद्दल ऐकायची तयारी ठेवा. जर देवेंद्रजींनी पाय ठेवला असता तर बाबरी पडली असती, तर मग हे तिथे असते तर कुठेतरी हवेनं उडून गेले असते असं आम्ही म्हणायचं का?, तुमच्या मुलाला म्यॅव म्यॅव केल तर मग चुकलं काय? असा सवाल नितेश राणे यांनी केला.

नितेश राणे हे मीडियाशी संवाद साधत होते. तुम्हाला घाबरणारा इथे कुणीच नाही. असल्या धमक्या द्यायचं बंद करा. मातोश्रीच्या नावानं हेराफेरी करणारे यशवंत जाधव काल तिकडेच होते. याचाच अर्थ तुमचा त्यांना आशीर्वाद आहे. आम्ही मुंबई लुटारूंपासून वेगळी करणार हेच परत सांगतो, असं नितेश राणे म्हणाले.

हिंदुत्वाबद्दल कशाला बोलता?

त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या ही भ्रष्टाचाऱ्याचं समर्थन करणारी. ब्लास्ट करणाऱ्या लोकांना पाठीशी घालणं ही यांची वृत्ती आहे. बाळासाहेबांच्या नावानं लोक जमवली आणि त्यांच्या भूमिकेच्या विरोधातच गेला. संभाजीनगर जाहीर कशाला करायचं म्हणताय अरे काय चाललंय? मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा करणेच चुकीचं आहे. जे महाराष्ट्रात दंगली घडवत आहेत त्याबद्दल तुम्ही भूमिका घेत नाही. तर मग हिंदुत्वाबद्दल कशाला बोलता? असा सवाल त्यांनी केला.

बुडाखाली किती अंधार हे बघतच नाही

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या टीकेचाही समाचार घेतला. वरूण सरदेसाईला सुरक्षेची गरज काय? यानं कधी मच्छर मारलाय का? पडळकर, सोमय्या आणि राणांवर हल्ले झालेत, असंही त्यांनी सांगितलं. जगातल्या प्रत्येक देशाबद्दल आणि राज्याच्या देशाबाहेरच्या प्रत्येक प्रश्नाबद्दल त्यांना बोलायच आहे. पण इथे त्यांना मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षण याबद्दल एक शब्द नाही. एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या, ऊसाचा प्रश्न, वीजेचा प्रश्न हे सगळ सोडून आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे बघतच नाही, अशी टीकाही त्यांनी केली.