इंधन टंचाई की अफवा? पेट्रोल-डिझेलविषयी समोर आली महत्त्वाची आकडेवारी.. आता कुणावर थेट कारवाई?
Fuel Shortage: राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा खराच तुटवडा आहे का? राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप ड्राय झालेले आहे. त्याचवेळी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता अनेकांचे धाबे दणाणणार आहेत.

Petrol-Diesel Shortage: देशात गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काल चौथ्यांदा दरवाढ झाली आहे. या दरवाढीचा मोठा फटका वाहनधारकांना बसणार आहे. तर त्याचवेळी राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेषतः डिझेलचा साठा नसल्याचे बोर्ड पंपचालकांनी लावलेले आहेत. तर काही ठिकाणी इंधन संपल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे. पण सरकारने याविषयीची मोठी आकडेवारीच समोर आणली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना थेट आकडेवारीच समोर आणली. त्यांनी राज्यात काही जण पेट्रोल आणि डिझेलचा साठा करत असल्याचे म्हटले आहे. तर राज्य सरकार आता अशा साठेबाजांवर थेट कारवाई करणार आहे.
साठेबाजांवर थेट ॲक्शन
23 मे रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किती अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल विकले गेले त्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार राज्यात पेट्रोल 23% अधिक तर डिझेल 52% अधिक विकले गेले. काही जिल्ह्यात तर हा आकडा 100% पेक्षाही वर पोहचला आहे. ही टंचाई नाही तर साठेबाजी असल्याचे सरकारने स्पष्ट केले. अशा साठेबाजांवर आता थेट ॲक्शन घेण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या पेट्रोल आणि डिझेलवर डल्ला मारणाऱ्यांवर गृह विभाग, नागरी पुरवठा विभाग संयुक्तपणे कारवाई करणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात अधिकची डिझेल विक्री?
मार्च महिन्यापासून आकडेवारी पाहता सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलची विक्रीत मोठा फेरबदल दिसत नाही. पण 23 मे 2026 पर्यंतची आकडेवारी धक्कादायक आहे. त्यानुसार, अकोला जिल्ह्यात डिझेलच्या विक्रीत शेकडा 154 टक्के इतकी मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात डिझेलची सरासरीपेक्षा 114 टक्के इतकी अधिकची विक्री झाली आहे. वाशिम जिल्ह्यात दरमहा जितके डिझेल लागते, त्यापेक्षा 104 टक्के अधिकची विक्री झाल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा 85 टक्के अतिरिक्त डिझेल विक्री झाली आहे. कोल्हापूरमध्ये सरासरीपेक्षा 85 टक्के अधिकची डिझेल विक्री झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा 87 टक्के अधिकची डिझेल विक्री झाली आहे.
पेट्रोलचीही मागणी अधिक असल्याचे समोर आले. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पेट्रोल विक्री झाली. त्यात वर्धा, वाशिम, जालना, जळगाव, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. इथं सरासरीपेक्षा 40 ते 53 टक्क्यांपर्यंत अधिकचे पेट्रोल विक्री झाले आहे. सरकारच्या दाव्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची अधिकची विक्री करण्यात आली आहे.
आता साठेबाजांना दणका
सरकारच्या मते अनेकजण भीती पोटी अथवा विक्री करण्याच्या उद्देशाने पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करत आहेत. अनेक जिल्ह्यातील विक्रीची आकडेवारी ही अत्यंत धक्कादायक आहे. आता इंधनाचा साठेबाजी पेट्रोल पंपावरून होत आहे की वाहनधारक काही माफीया ती करत आहेत हे लवकरच समोर येईल. अशा साठेबाजांविरोधात सरकार कडक पावलं टाकणार आहे. या काळ्याबाजारामुळे सामान्य नागरीक आणि शेतकर्यांना इंधन पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे.