Mumbai Airport: मुंबई एअरपोर्टवरील विमानं नवी मुंबईत हलवण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी माहिती

मुंबई आणि नवी मुंबई ही दोन्ही विमानतळं स्वतंत्रपणे कार्यरत राहावीत, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलवण्याऐवजी मुंबई विमानतळाचाच विस्तार करण्याचा पर्याय त्यांनी पुढे आणला आहे.

Mumbai Airport: मुंबई एअरपोर्टवरील विमानं नवी मुंबईत हलवण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 11, 2026 | 9:25 AM

Mumbai Airport: मुंबई आणि नवी मुंबईतील विमानतळांवरून सुरू असलेल्या चर्चेला आता महत्त्वाचं वळण मिळालं आहे. मुंबई विमानतळावरील एकही विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्यात येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुंबई विमानतळावरील उड्डाणं नवी मुंबई विमानतळावर हलवण्याची कोणतीही योजना नसून दोन्ही विमानतळ स्वतंत्रपणे आणि आपापल्या क्षमतेनुसार कार्यरत राहतील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री यांना पत्र लिहिलं आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-1 च्या पुनर्विकासासाठी त्यांनी पर्यायी आराखडाही सुचवला आहे. त्यामुळे विमानतळावरील उड्डाणांचं स्थलांतर करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबई विमानतळावरील टर्मिनल-1 च्या पुनर्विकासाचं काम नियोजित पद्धतीने करण्याची सूचना फडणवीस यांनी केली आहे. त्यांच्या प्रस्तावानुसार, सर्वप्रथम टर्मिनल-1B उभारण्यात यावं. त्यानंतर सध्या कार्यरत असलेल्या टर्मिनल-1A वरील उड्डाणे नव्या टर्मिनल-1B मध्ये स्थलांतरित करावीत. टर्मिनल-1A पूर्णपणे रिकामं झाल्यानंतर ते पाडून त्याचा पुनर्विकास करावा, अशी त्यांची भूमिका आहे. या पद्धतीमुळे जुन्या टर्मिनलमधील कामकाज पूर्णपणे बंद न करता विमानतळाचा विस्तार करता येऊ शकतो. तसंच प्रवाशांची गैरसोय आणि विमान कंपन्यांवरील अतिरिक्त ताण टाळण्यास मदत होऊ शकते.

Loading...

दरम्यान, मुंबई विमानतळाचं संचालन करणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (MIAL) टर्मिनल-1 च्या पुनर्विकासासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांचं नियोजन बदलण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार मुंबईहून 14 आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये जाणारी आणि तिथून मुंबईत येणारी उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर हलवण्याची योजना होती.

या शहरांमध्ये बहरीन, दमाम, ढाका, दोहा, फुजैरा, जकार्ता, जेद्दा, काठमांडू, कुवेत सिटी, मदिना, मस्कत, रास अल खैमाह, रियाध आणि शारजाह यांचा समावेश होता. उन्हाळी वेळापत्रक 2027 पासून या बदलांची अंमलबजावणी करण्याचा विचार होता. मात्र, या प्रस्तावाला अनेक विमान कंपन्यांनी विरोध केला होता. विमानतळ बदलल्यास प्रवाशांना कनेक्टिंग फ्लाइटसाठी दोन्ही विमानतळांदरम्यान प्रवास करावा लागू शकतो, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली होती. . मुख्यमंत्र्यांचा पर्यायी प्रस्ताव आता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विचाराधीन असून, त्यावरील अंतिम निर्णयाकडे प्रवासी आणि विमान कंपन्यांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us