आता वॉटर टॅक्सीने अर्ध्या तासांत बेलापूरहून गेट वे गाठा, पुढच्या आठवड्यात सेवा सुरू

| Updated on: Jan 27, 2023 | 8:11 PM

बेलापूर ते गेटवे वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन येत्या 4 फेब्रुवारीला होणार आहे. हार्बरमार्गाने लोकलद्वारे बेलापूरहून सीएसएमटीला पोहचण्यास तासभर जातोच, त्याऐवजी आता अर्ध्या तासात बोटीने मुंबईत येता येईल,

आता वॉटर टॅक्सीने अर्ध्या तासांत बेलापूरहून गेट वे गाठा, पुढच्या आठवड्यात सेवा सुरू
NAYAN-11
Image Credit source: NAYAN-11
Follow us on

मुंबई : नवीमुंबईकरांना लवकरच बेलापूर ते गेटवे ऑफ इंडीयाला वॉटर टॅक्सीने आता अवघ्या अर्ध्या तासांत पोहचता येणार आहे. दुमजली बोटीतून हा प्रवास करता येणार आहे. त्यासाठी ( Nayantara Shipping )  नयनतारा शिपिंग प्रा.लि.ने MyBoatRide.com शी एक करार केला असून प्रवाशांना या सफरीचे तिकीटे ऑनलाईन बुकींग करता येणार आहेत. यापूर्वी या कंपनीने नोव्हेंबर महिन्यात भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) अशी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली होती.

बेलापूर ते गेटवे वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन येत्या 4 फेब्रुवारीला होणार आहे, ही दुमजली नयन नौकाची पहीली फेरी बेलापूरहून स. 8.30 वा. निघेल आणि 9.30 वा. गेटवेला पोहचेल. तर गेटवेहून दुसरी फेरी सायं.6.30 सुटेल आणि बेलापूरला रा. 7.30 वा. पोहचेल. लोअर डेकसाठी 250 रू. तिकीट असेल तर अपर डेक ( business class deck) साठी 350 रू. तिकीट दर असणार आहे.

लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी 

बेलापूर रेल्वे स्टेशनपासून बेलापूर जेटीवर जाण्यासाठी 10 रुपयांत शेअरिंग रिक्षा उपलब्ध आहे  आणि गेटवे ऑफ इंडिया ते चर्चगेट आणि सीएसटी, कॅब शेअरींंग तसेच बेस्टच्या बसचे पर्याय उपलब्ध आहेत.

अशी आहे वातानुकूलीत दुमजली बोट 

गोवा येथे बांधलेली दुमजली बोट ही दुमजली बोट संपुर्ण वातानुकूलित असलेल्या या बोटीच्या पहिल्या मजल्यावर दोन तर तळमजल्यावर चार प्रसाधनगृह आहेत. या बोटीला दोन 750 हॉर्स पॉवर व्होल्वो पेण्टा ही हायस्पीड इंजिने बसविली आहेत. या बोटीत तळमजल्यावर ( इकॉनॉमी क्लास) 139 प्रवाशांना बसण्याची व्यवस्था असून वरच्या ( बिझनेस क्लास ) मजल्यावर 60 प्रवाशांना बसण्याची व्यवस्था आहे.

भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) प्रतिसाद नाही 

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात भाऊचा धक्का ते बेलापूर, बेलापूर ते जेएनपीटी आणि बेलापूर ते एलिफंटा अशा तीन मार्गांवरील वॉटर टॅक्सी सेवेला सुरूवात केली होती. तर गेल्या वर्षी एक नोव्हेंबरपासून भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती, परंतू तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या मार्गावर कोरोना काळातच पर्यटकांना आपल्या वाहनांसह प्रवास करता येणारी आलीशान M2M Ferries Ro-Pax  ही रो पॅक्स सेवा सुरू झाली आहे.