
भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे PA अनंत गर्जे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अनंत यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवेने मुंबईतील राहत्या घरात स्वत:ला संपवले आहे. गेल्या काही दिवसांपासून गौरी आणि अनंत यांच्यामध्ये वाद सुरु होते. अनंत यांचे बाहेरच्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय गौरी यांना होता. यावरुन दोघांमध्ये सतत भांडणे होत असत. मानसिक तणावत असलेल्या गौरी यांनी शनिवारी 22 नोव्हेंबर रोजी टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर गौरीच्या आईने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे आईची प्रतिक्रिया?
मुंबईतील राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केल्यानंतर गौरीच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. गौरीच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. गौरीच्या आईने या सगळ्यावर प्रतिक्रिया देत, आता मी काय बोलू? माझी लेक गेली एवढच म्हटले आहे. गौरीच्या इतर नातेवाईकांनी देखील अनंत गर्जे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे असा आरोप केला आहे. तसेच गौरीचे आई- वडील गुन्हा दाखल करण्यासाठी वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
दहा महिनेच केला संसार
मुंबईतील वरळी येथे राहणाऱ्या अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे (वय २८) यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये मोठ्या थाटात पार पडलेल्या या दाम्पत्याच्या लग्नाला खुद्द पंकजा मुंडे या आपली बहीण प्रीतम मुंडे यांच्यासह हजर होत्या. लग्नाला अवघे दहा महिने उलटत नाही तोच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील आपले सर्व कार्यक्रम तात्काळ रद्द केले आहेत.
काय घडले नेमके?
गौरी यांचा मृतदेह वरळी येथील त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. गौरी यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी सांगितले की, लग्नानंतर गौरी या सतत अस्वस्थ होत्या. अनंत गर्जे यांचे कोणाशी तरी अफेअर असल्याचा संशय गौरी यांना होता, तसेच सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पोस्टमार्टम अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेने बीड आणि मुंबईतील राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे.