दीपकेचा फुगा आज फुटला, पूर्णपणे फेल गेलेलं आंदोलन बघितलं, नौटंकीची स्क्रिप्ट… भाजपची जोरदार टीका
शिवाजी पार्क येथील आंदोलनावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. आंदोलनात विद्यार्थ्यांचा प्रश्न बाजूला पडून ज्ञानेश कुमार यांना समोर ठेवून राजकीय नौटंकी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आंदोलनातील उपस्थितीही अत्यल्प असल्याचे दरेकर म्हणाले.

शिवाजी पार्क येथे झालेल्या सीजेपीच्या आंदोलनावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. हे आंदोलन पूर्णपणे फेल गेल्याचा दावा दरेकर यांनी केला. विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, मात्र त्यावर निर्णय झालेला असताना ज्ञानेश कुमार यांना समोर ठेवून राजकीय नौटंकी करण्याचा प्रयत्न झाल्याचे ते म्हणाले. तसेच आंदोलनातील उपस्थितीही खूप कमी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरेकर म्हणाले की, आंदोलनात उबाठाचे आमदार महेश सावंत, साईनाथ दुर्गे आणि मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अभिजित दिपके यांना अनेक वेळा शांत बसण्यास सांगावे लागले. ते म्हणाले की, आंदोलनात राजकारण भरलेली नौटंकी पाहायला मिळाली.
दरम्यान, दिपके यांनी केलेल्या काही वक्तव्यांवरही दरेकर यांनी आक्षेप घेतला. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची दरेकरांनी निषेध केला. नेहरूंच्या बुद्धिमत्तेमुळे बाबासाहेब घडले, वाढले आणि महान झाले, असे वक्तव्य केल्याचा दावा करत दरेकर यांनी दिपके यांनी याबाबत माफी मागावी, अशी मागणी केली.
SIR प्रक्रियेवरही भाष्य
SIR म्हणजे मतदार यादी शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे, नावं काढण्याची प्रक्रिया नाही, असे दरेकर यांनी सांगितले. अपात्र किंवा दुहेरी नोंदणी असलेली नावं नियमानुसार काढली जात असून त्यासाठी क्लेम आणि ऑब्जेक्शनची प्रक्रियाही असल्याचे त्यांनी म्हटले. सीजेपीला राजकारण करायचे असून मुद्दा घेऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. ज्ञानेश कुमार ही व्यक्ती नसून ते मुख्य निवडणूक आयुक्त असल्याचे सांगत त्यांनी आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला.
दरेकर यांनी अभिजीत दिपके यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेलाही प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचा अभ्यास करावा, असे ते म्हणाले. तसेच फडणवीस हे संघाच्या मुशीत तयार झालेले नेते असून खुर्चीसाठी त्यांनी कधीही राजकारण केलेले नाही, असा दावा दरेकर यांनी केला.
मोदी यांच्यावरही दिपके यांनी केलेल्या टीकेवर दरेकर यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या कामाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव असल्याचा दावा त्यांनी केला. संघाबाबतची वक्तव्ये करताना आंदोलनाचा मूळ मुद्दा बाजूला पडला आणि राजकीय नौटंकी पाहायला मिळाली, असा आरोप त्यांन केला.