India Vs Pakistan सामन्यानंतर राज ठाकरेंनी डिवचले, सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागणार आणि विचार करायला भाग पाडणार व्यंगचित्र केलं शेअर

राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन एक व्यंगचित्र पोस्ट करून भाजप नेते अमित शहा आणि जय शहा यांच्यावर टीका केली आहे. पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी क्रिकेट विजयापेक्षा देशभक्तीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

India Vs Pakistan सामन्यानंतर राज ठाकरेंनी डिवचले, सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागणार आणि विचार करायला भाग पाडणार व्यंगचित्र केलं शेअर
| Updated on: Sep 17, 2025 | 9:39 AM

सध्या संपूर्ण देशभरात भारत आणि पाकिस्तान या आशिया चषकातील टी-२० सामन्याची चर्चा सुरु आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. मात्र या सामन्यावरुन विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. यावरुन सध्या राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सामन्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून अमित शहा आणि जय शहा यांच्यावर व्यंगचित्रातून टीका केली आहे. पहलगामच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांचा आणि क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत नेमकं कोण जिंकलं, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

व्यंगचित्रात नेमकं काय?

राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरुन एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. या व्यंगचित्राद्वारे राज ठाकरे यांचे पुन्हा फटकारे मारले आहेत. या व्यंगचित्रामध्ये पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहायला मिळत आहे. यासोबतच अमित शाह आणि जय शाह हे दोघं तिथे उभे आहेत. यावेळी जय शाहा एका मृतदेहाला हात लावून भारत पाकिस्तान सामन्याच्या विजयाबद्दल सांगत आहेत. अरे सर्वांनी उठा, आपण पाकिस्तानच्या विरोधात विजय मिळवालय, असे जय शाह हे मृतदेहांना सांगताना दिसत आहे. यावेळी दुसऱ्या बाजूला पहलगाम असे लिहिले आहे. त्यासोबतच या व्यंगचित्रावर नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं? असा खोचक सवाल करण्यात आला आहे.

व्यंगचित्रातून तीव्र नाराजी

या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व त्यांचे चिरंजीव जय शहा यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावरुन राजकारण आणि देशभक्तीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. पहलगाममधील हल्ल्यात काही भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेला अद्याप एक वर्षही उलटलेले नाही.

मात्र तरीही भारत-पाकिस्तान सामन्याचे आयोजन करण्यात आले. यावरुन आता राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या व्यंगचित्रातून त्यांनी देशाच्या सुरक्षेपेक्षा क्रिकेटला अधिक महत्त्व दिले जात असल्याबद्दल सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. राज ठाकरेंच्या या व्यंगचित्राची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.