
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) आणि राम शिंदे (ram shinde) यांचं संसदीय राजकारणात पुनरागमन झालं आहे. हे दोन्ही नेते विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तसेच सचिन अहिर (sachin ahir), आमशा पाडवी, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड, उमा खापरे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, चंद्रकांत हंडोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. या दोन्ही उमेदवारांची मते अद्याप जाहीर झाली नाहीत. या निवडणुकीत काँग्रेसची दोन मते फुटल्याची चर्चा आहे. एकीकडे खडसे, राम शिंदे यांचा विजय होताच त्यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला आहे. मुक्ताईनगरात तर दिवाळी साजरी होत आहे.
दुपारी 4 वाजता मतदान संपलं. त्यानंतर संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास मतमोजणीस सुरुवात होणार झाली. मतमोजणीच्या वेळी राष्ट्रवादी आणि भाजपचं प्रत्येकी एक एक मत बाद झालं. भाजपच्या उमा खापरे आणि राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मत पत्रिकेत खाडाखोड करण्यात आल्याने ही दोन्ही मते बाद करण्यात आली आहेत. त्यामुळे भाजपचा उमेदवार पडणार की काय अशी शक्यता वर्तवली जात होती. पण भाजपने प्रत्येक उमेदवारासाठी कोटा ठरवून दिला होता, त्यामुळे गणित कुठे तरी चुकतं की काय असं वाटत होतं. मात्र, उमा खापरे या 26 मते घेऊन विजयी झाल्या आहेत.
भाजप उमेदवार
1) प्रवीण दरेकर -26
2) राम शिंदे -26
3) श्रीकांत भारतीय – 26
4) उमा खापरे -26
5) प्रसाद लाड – 26
शिवसेना
1) सचिन अहिर -26
2) आमशा पाडवी- 26
काँग्रेस
1) चंद्रकांत हंडोरे -26
राष्ट्रवादी
1) रामराजे नाईक निंबाळकर-26
2) एकनाथ खडसे-27
दरम्यान, आपले उमेदवार विजयी होणार याची भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना खात्री होती. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी निकाला आधीच विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली होती. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मतदानानंतर नागपूरला रवाना झाले. उमेदवार विजयी होण्याची खात्री नव्हती म्हणूनच पटोले नागपूरला गेले होते काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, भाई जगताप की प्रसाद लाड याचा फैसला अद्याप झालेला नाही.