रामदास कदम यांचा एकनाथ शिंदेंना फोन, थेट मोठा आरोप; म्हणाले, आपला कोण…
रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून पक्षातील काही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या आरोपावर आक्रमक भूमिका न घेतल्याबद्दल खंत व्यक्त केली. 'आपलं कोण, त्यांचं कोण हे वेळीच ओळखायला हवं', असे म्हणत कदम यांनी शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींचा बॉम्ब फोडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील यांनी एक क्लिप व्हायरल करून हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे शिंदे गट चांगलाच अडचणीत आला होता. शिंदे गटाकडून रामदास कदम यांनी जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे जरांगे आणि कदम यांच्यात चांगलीच जुंपली होती. त्यानंतर रामदास कदम पक्षात एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालं होतं. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कदम यांना फोन करून शांत राहण्यास सांगण्यात आलं होतं. आता परत रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून आपल्याच पक्षातील नेत्यांनी या प्रकरणात कच खाल्ली, असा आरोपच केला आहे.
रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खंत व्यक्त केली आहे. कथित ऑडिओ क्लिप संदर्भात आपल्या अनेक नेत्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली नाही. ज्या पद्धतीने मी पक्षाची बाजू मांडली तशी कोणत्याही नेत्याने मांडली नाही. आपलं कोण? आणि त्यांचं कोण? हे वेळीच ओळखलेलं बरं, असं रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेंना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काय म्हणाले होते जरांगे?
मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्यावर हल्ला चढवला होता. रामदास कदम यांच्याकडे त्या क्लिपची तारीख कुठून आली? त्यांना ही तारीख कशी समजली? पूर्ण क्लिप ऐकवण्याऐवजी कदम फक्त शिंदेंवरील आरोपाचा भागच का ऐकवतात? यामागे रामदास कदम यांचा हेतू काय? कोण एकनाथ शिंदेंची बदनामी करत आहे? मी शिंदेंची बदनामी केली नाही. रामदास कदम यांनीच शिंदेंची बदनामी केली. माझ्या आधी त्यांनीच ही क्लिप व्हायरल केली. मााझ्याकडून तर तो विषय संपलाच होता, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं.
माझ्या कानात बिड्या आहे का?
माझ्याकडून गृहमंत्रालयाने, फडणवीस आणि शिंदेंनी क्लिप घेण्यापेक्षा रामदास कदम यंच्याकडून घ्यावी. त्यांच्याकडे ओरिजिनल क्लिप आहे. त्यांना क्लिपची तारीख माहीत आहे. त्यांना कुणी दिली हे त्यांनाच माहीत आहे. माझ्या आधी चॅनलवर आधी क्लिप ऐकवली गेली. माझ्या आधी रामदास कदम यांनी क्लिप ऐकवली. मी दोन तासानंतर पीसी घेतली. मी एकनाथ शिंदेंना बदनाम केलं म्हणता, माझ्या आधी रामदास कदम यांनी काय केलं? ती काय शिंदेंना शाबसकी होती का? श्रीकांत भैय्यांनी 500 कोटी रुपये घेतले एवढीच क्लिप रामदास कदम यांनी ऐकवली. कोण बदनामी करतंय हे न कळण्या इतके शिंदे बोळ्याने दूध पितात का? आमच्याही कानात बिड्या आहेत काय? असा सवाल जरांगे यांनी केला होता.