बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
संजय राऊत यांचा खळबळजनक दावा: अमित शाह लॉरेन्स बिश्नोईला साबरमती तुरुंगात संरक्षण देऊन राजकीय गुन्हे घडवून आणत आहेत. बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात, तसेच बॉलिवूडवर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. शिवसेनेतील सत्तांतरामागेही याच 'बिश्नोई'चा हात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

लॉरेन्स बिश्नोई हा साबरती तुरुंगात आहे. तो देशातील अनेक राज्यांच्या पोलिसांना हवा आहे. त्याचा ताबा इतर राज्यांना का दिला जात नाही? अमित शाह हे बिश्नोईच्या नावाखाली हवे ते गुन्हे करून घेत आहेत. त्यामुळेच त्याला साबरमतीत ठेवलं आहे, असं सांगतानाच लॉरेन्स बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात. हे माझं भाकीत नाहीये. मी सत्य सांगतोय, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
खासदार संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई आहेत हे बोलण्याचं धाडस कोणी केलं नाही. या देशातील माफियांच्या टोळ्या भाजपच्या छत्राखाली आणण्याचं काम शाहांनी केलं. भ्रष्टाचाऱ्यांना त्यांनी प्रतिष्ठा दिली. बिश्नोई तुरुंगात आहे. अनेक राज्यात गुन्हे घडले आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, पंजाब आणि चंदीगड पोलिसांना तो अनेक खून प्रकरणात हवा आहे. जेव्हा एखादा आरोपी हवा असतो तेव्हा पोलीस ट्रान्झिस्ट कस्टडीसाठी प्रयत्न करतात. पंजाबमध्ये सिद्धू मुसेवाला या गायकाची हत्या झाली. या प्रकरणात पंजाब पोलिसांना तो हवा आहे. बाबा सिद्दीकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी बिश्नोईची मागणी केली. सलमान प्रकरणात मागणी झाली. आता टायगर श्रॉफ प्रकरणात मागणी होईल. बिश्नोई गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहे. त्याचं हस्तांतरण इतर राज्यात का होत नाही? परदेशातून गुन्हेगार आणले जातात. म्यानमारमधूनही आपण गुन्हेगार आणले आहेत. मग साबरमती तुरुंगातील गुन्हेगार पोलिसांना का दिला जात नाही? याचा अर्थ बिश्नोई हे नाव आहे. खरा चेहरा अमित शाहांचा आहे. शाह त्याच्या नावाखाली त्यांना हवे असलेले गुन्हे करून घेत आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपचा बिश्नोई कोणत्याही…
आज बॉलिवूडवर दहशत निर्माण केली जात आहे. अमित शाह आणि गुजरातच्या लोकांचा बॉलिवूडवर नियंत्रण मिळवण्याचा पहिल्यापासून प्रयत्न सुरू आहे. आता जसजसं राजकारण वेगाने पुढे जाईल, रिजीम चेंजचा जसा मुद्दा वाढेल, तेव्हा याच बिश्नोईच्या नावाखाली विरोधकांच्या हत्या होतील. विरोधकांवर हल्ले होऊ शकतात. हे माझं भाकीत नाही तर मी सत्य सांगतोय, असा दावा राऊत यांनी केला. भाजपचा लॉरेन्स बिश्नोई कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यांना फ्रस्टेशन आलं आहे. ते फ्रस्टेशनमध्ये गेले आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.
बिश्नोईने सत्तांतर केलं
ठाकरे गटात रिजिम चेंज झालं, ते ठाकरेंना कळलंही नाही, असा हल्ला विरोधकांनी केला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या पक्षातील रिजिम चेंज दिल्लीतील लॉरेन्स बिश्नोईने केलं. त्याचा उल्लेख मी काल केला. हे सर्व लॉरेन्श बिश्नोईचे साथीदार आहेत. काल जे शिवसेनेचे बोर्ड लावून भाषण करत होते ते सर्व छोटे लॉरेन्स बिश्नोई आहेत. मोठे लॉरेन्स बिश्नोई गुजरातचे दिल्लीत आहेत. बिश्नोईच्या धमक्या, ताकद, बंदुकीच्या गोळ्यांच्या जोरावर झालेलं हे सत्तांतर होतं. ते काही मतांच्या जोरावरचं नव्हतं, असं राऊत म्हणाले.