शरद पवार सिर्फ नामही काफी है, पवारांपुढे दिल्लीलाही झुकावं लागतं : संजय राऊत

| Updated on: Feb 08, 2020 | 6:39 PM

"आधीच्या सरकारने शिक्षणाच्या आयचा घो केला", असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

शरद पवार सिर्फ नामही काफी है, पवारांपुढे दिल्लीलाही झुकावं लागतं : संजय राऊत
Follow us on

मुंबई : “शरद पवार सिर्फ नामही काफी है. महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावं लागतं आणि हे आपण दाखवून दिलं आहे”, असं राज्यसभेचे खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) म्हणाले.

विधानपरिषदेचे आमदार आणि लोकभारतीचे प्रमुख कपिल पाटील यांनी मुंबईत शिक्षण मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केलं आणि भाजपवर सडकून टीका केली (Shiv Sena MP Sanjay Raut).

“आधीच्या सरकारने शिक्षणाच्या आयचा घो केला”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. ‘आयचा घो’ हा शिवसेनेने संमत केलेला शब्द आहे, असंदेखील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“पाच वर्षात भाजपने पाठ्यपुस्तकातले धडे आणि इतिहास बदलला त्यामुळे आपण सरकार बदललं. लोकशाहीमध्ये यापेक्षा कोणता मोठा धडा असू शकतो? धडे बदलवणाऱ्यांना आपण घरी बसवलं”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

“कपिल पाटील आम्हाला वाटलं स्टेडियम फक्त आम्हीच भरु शकतो. पण मुंबईत शिक्षकांच्या मेळाव्याला स्टेडियम भरलं. हा संगतीचा परिणाम आहे. महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही उभे आहात”, असं संजय राऊत म्हणाले.

“सत्ता स्थापनेच्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आशेने डोळे लावून होतो. कपिल जसा पाच वर्ष तुम्ही संघर्ष केला तसा सत्तेत राहून आम्हीही संघर्ष केला”, असा खुलासा राऊत यांनी केला.

“आता धडा आपण दिला आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. शिक्षण क्षेत्र स्वच्छ केलं पाहिजे. शिक्षणाची महाराष्ट्राला एक मोठी परंपरा आहे. जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फतिमा शेख, शाहू महाराज यांची सर्वांची शिक्षणाची परंपरा आहे. स्वत: शरद पवार रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत”, असं राऊत म्हणाले.

शिक्षकांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर पवारांची लाल शाई : राऊत

“प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांच्या शंभारापेक्षा जास्त मागण्या आहेत. आता पवार यांनी किती मागण्यांवर टीक केली आहे ते मला माहिती नाही. मात्र, त्यांनी काही प्रमुख मागण्यांवर लाल शाईने टीक केलं आहे. त्यांनी पेन्शन, सातवे वेतन आयोगाच्या मागणीवर टीक केलं आहे. शरद पवार यांनी रात्र शाळेच्या संदर्भातील प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यांवर टीक केल्याचं मी हळूच पाहिलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.