दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, थेट दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात….
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट पाहायला मिळत आहे, त्यामुळे नेस्को सेंटर इथे होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात आता मोठे बदल करण्यात आले आहेत.

दसऱ्यासाठी मुंबईमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून मोठी तयारी सुरु असते. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गट यांचे दसरा मेळावे हे राज्यामध्ये प्रचंड गाजतात. या मेळाव्यातून दोन्ही पक्ष त्यांच्या पुढील भूमिका जाहीर करतात. मुख्य नेत्यांची भाषणं ही या मेळाव्याचे मुख्य आकर्षण असते. एकीकडे उद्धव ठाकरेंचा ठाकरी बाणा तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे करारी भाषण या दोन्हीची शिवसैनिकांना ओढ असते. पण यंदा शिंदेंच्या शिवसनेने त्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये मोठा बदल केला आहे.
नेमका काय केला बदल?
नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात यंदा सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. दरवर्षी सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स ठेवले जातात. मात्र यंदा ते रद्द करण्यात आले आहेत. यावेळी थेट भाषण होणार असून, अवघ्या 2 ते अडीच तासांत मेळावा संपवला जाणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मदत पाठवली जाणार आहे. गेल्या वर्षी पूरग्रस्तांना मदत करण्यात आली होती, तर यंदा दुष्काळग्रस्तांना मदत दिली जाणार आहे.
ठाकरेंच्या मेळाव्यात काय घडणार?
दरम्यान, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादर शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. यंदा उद्धव ठाकरे काय भाषण करणार याकडे लक्ष लागलं आहे. उद्या होणाऱ्या या मेळाव्यापूर्वी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्यामध्ये हुकूमशाहीला दणका देण्यासाठी, लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी…चला, एल्गार करूया! दसरा मेळावा २०२६ स्थळ – शिवतीर्थ, दादर असं लिहिलं आहे. त्यामुळे आता उद्या संध्याकाळी होणाऱ्या दोन्ही मेळाव्यांना किती शिवसैनिक हजेरी लावणार हे पाहणं महत्त्वाचं मानलं जात आहे.
इतर मेळाव्यांकडेही लक्ष
तर राज्यात दसरा मेळाव्यांची यादी वाढली आहे. दरवर्षी अनेक ठिकाणी मेळावे पार पडत आहेत. ज्यामध्ये नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा पार पडतो. संघप्रमुख त्यांचे संबोधन करतात. त्याशिवाय मराठवाड्यातही दोन मेळावे हे दसऱ्याच्या दिवशीच होतात. त्यापैकी एक मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावरचा मेळावा असतो. तर दुसरा पंकजा मुंढे यांचा मेळावा असतो, जो भगवानगडावर पार पडतो.
