शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मोठी अपडेट, ठाकरे गटाला दिलासा, कोर्टाचा नेमका निकाल काय?

| Updated on: Mar 23, 2023 | 10:02 PM

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संबंधित प्रकरणी कोर्टाने ठाकरे गटाला दिलासा दिला आहे. त्यामुळे जवळपास सात शिवसैनिकांची जेलमधून मुक्तता होणार आहे.

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मोठी अपडेट, ठाकरे गटाला दिलासा, कोर्टाचा नेमका निकाल काय?
sheetal mhatre
Follow us on

मुंबई : शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे (Sainath Durge) यांच्यासह सात जणांना अटक केलेली. या सातही जणांना आज अखेर जामीन मिळाला आहे. त्यामुळे जवळपास दहा दिवसांनी त्यांची जेलमधून मुक्तता होणार आहे. या सातही जणांचा आज कोर्टाकडून जामीन मंजूर झाला. त्यामुळे उद्या त्यांची जेलमधून सुटका होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. साईनाथ दुर्गे हे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत.

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा कथित व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सात शिवसैनिकांना अटक करण्यात आलेली. यात आदित्य ठाकरे यांच्या जवळचे साईनाथ दुर्गे यांचा देखील समावेश होता. त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता बोरिवली न्यायालयाने साईनाथ दुर्गे यांच्यासह इतर सहा आरोपींना जामीन मंजूर केला आहे. ज्येष्ठ वकील राजेश मोरे, ज्येष्ठ वकील अनिल पार्टे यांना वकील प्राची पार्टे, वकील मेराज शेख यांनी या प्रकरणी युक्तिवाद केला.

जामीन मंजूर झालेले शिवसैनिक :

1) साईनाथ दुर्गे
2) अशोक मिश्रा
3) मानस अनंत कुवर
4) विनायक डायरे
5) रविन्द्र चौधरी
6) अक्षय धनधर
7) यशवंत विचले

जामीन देताना कोर्टाच्या अटी-शर्ती

दरम्यान, कोर्टाने या सातही शिवसैनिकांचा जामीन मंजूर केला असला तरी काही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. या अटी पाळल्या गेल्या नाहीत तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. आरोपींना दर सोमवारी दहिसर पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार. त्यांनी सोशल मीडिया वापरायचं नाही. मुंबई बाहेर जायचं नाही, अशा अटींवर आरोपींना 20 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

‘साईनाथ आमचा वाघ’, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य

साईनाथ दुर्गे यांना पोलीस कोठडी सुनावली तेव्हा आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या दादरच्या घरी जावून कुटुंबियांची भेट घेतलेली. यावेळी त्यांनी साईनाथ आमचा वाघ असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते. “साईनाथ आमचा वाघ आहे. तो अन्यायाच्या विरुद्ध लढतोय. या राज्यात मोगलाई आल्यासारखी धरपकड चालू आहे. तरुणांचे खोटे आरोपांवरुन आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न चालू आहे. त्याच्याविरुद्ध आम्ही लढत राहू. त्याविरोधात आम्ही लढत राहू. साई हा युवासेनेचा व शिवसेनेचा वाघ आहे तोही लढत राहील. अशा मोगलाईला कोणी घाबरत नाही. हा महाराष्ट्र आहे आणि आम्ही या अन्यायाविरुद्धल लढलो”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दुर्गे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर दिलेली.