
शिवसेना ठाकरे गटाचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला. या वर्धापन दिन सोहळ्याला अवघे तीन दिवस उलटले आहेत. त्यातच आज ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ईश्वर तायडे आणि आकांक्षा शेट्ट्ये या दोन ठाकरे गटाच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर जोरदार टीका केली. त्यांनी नुकत्याच झालेल्या पक्षप्रवेशांचे दाखले देत भाजप मुंबईत नंबर एकचा पक्ष झाल्याचा दावा केला. तसेच मुंबईकरांच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी उपस्थितीत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी ठाकरे गटाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल, असे आशिष शेलार म्हणाले.
ठाकरे गटाची अवस्था धोकादायक आणि जीर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत त्यावर तो पक्ष जीर्ण अवस्थेत आहे. 2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर 1 चा पक्ष झाला. शिवाय मूळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.