ठाकरे गटाचे ‘त्या’ तीन नेत्यांना पराभूत करण्यासाठी शिंदे गटाचा खास प्लॅन; श्रीकांत शिंदे स्वत: अ‍ॅक्शनमोडमध्ये

युवा सेनेच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे लोकाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. त्यामुळे अनिल परब, आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत यांना आपल्या मतदारसंघात विशेष लक्ष घालावे लागणार आहे.

ठाकरे गटाचे त्या तीन नेत्यांना पराभूत करण्यासाठी शिंदे गटाचा खास प्लॅन; श्रीकांत शिंदे स्वत: अ‍ॅक्शनमोडमध्ये
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 01, 2023 | 10:24 AM

मुंबई : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. राज्यभरात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ज्या मतदारसंघात विजय मिळू शकतो अशा मतदारसंघावर सर्वच राजकीय पक्षांनी फोकस केला आहे. तर ज्या मतदारसंघात पक्ष कमी पडोत त्या मतदारसंघात इच्छुक उमेदवाराला बळ देण्याचं काम राजकीय पक्षांनी सुरू केलं आहे. मात्र, असं असलं तरी शिंदे गटाने वेगळाच प्लान सुरू केला आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या तीन नेत्यांच्या विरोधात मोठा प्लान सुरू केला आहे. या तीन नेत्यांना पराभूत करण्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, खासदार विनायक राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहेत. या तीन नेत्यांना पराभूत करण्यासाठी श्रीकांत शिंदे मुंबईभर शिवसेना शाखा संपर्क अभियान राबवणार आहे. तसेच या तिघांच्या मतदारसंघामध्ये शाखांच्यामाध्यमातून शिवसेनेचे जास्तीत जास्त कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिघांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार करण्याची रणनीती शिंदे गटाने आखली आहे. त्याची सूत्रे स्वत: श्रीकांत शिंदे यांनी हाती घेतली आहेत. त्यामुळे या तिन्ही नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

युवा सेनाच्या माध्यमातून संपर्क

या तिन्ही नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये श्रीकांत शिंदे स्वतः कार्यकर्त्यांची संपर्क साधणार आहेत. युवा सेनेच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे लोकाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. त्यामुळे अनिल परब, आदित्य ठाकरे आणि विनायक राऊत यांना आपल्या मतदारसंघात विशेष लक्ष घालावे लागणार आहे. त्यांना गाफील राहून चालणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ठाकरे गटाला सुरुंग लावणार

श्रीकांत शिंदे या तिन्ही नेत्यांच्या मतदारसंघात लक्ष घालणार आहेत. याचा अर्थ ते फक्त शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार नाहीत. तर या मतदारसंघातील शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात या तिन्ही नेत्यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याचीही चर्चा आहे.