Ajit Pawar : छत्रपती संभाजी महाराजांचे तूळापूर येथील स्मृतीस्थळ; वढु बुद्रुकच्या समाधीस्थळ परिसराचा विकास करणार

| Updated on: Dec 27, 2021 | 10:53 PM

उपरोक्त विकास कामासाठी समाधीस्थळ व भौतिक सुविधा पुरविण्यासाठी एक विशेष कार्यक्रम-योजना राबविण्यात येईल व त्यासाठी अंदाजे रु. 150 कोटी इतका निधी आवश्यक असून तो टप्याटप्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनावेळी सांगितले.

Ajit Pawar : छत्रपती संभाजी महाराजांचे तूळापूर येथील स्मृतीस्थळ; वढु बुद्रुकच्या समाधीस्थळ परिसराचा विकास करणार
छत्रपती संभाजी महाराजांचे तूळापूर येथील स्मृतीस्थळ; वढु बुद्रुकच्या समाधीस्थळ परिसराचा विकास करणार
Follow us on

मुंबई : स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतीस्थळ, शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसंच तूळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी तथा छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी छत्रपती सईबाई यांचे राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधीस्थळ परिसरचाही विकास करण्यात येईल. महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मिता असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिला.

छत्रपती संभाजी महाराज अखंड महाराष्ट्राचे, संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान

महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक हौतात्म्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन वंदन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज हे, महाराष्ट्राची अस्मिता, अखंड महाराष्ट्राचे, संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमानाचं रक्षण करण्याचं ऐतिहासिक कार्य, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. महाराष्ट्र धर्माचं, स्वराज्याचं रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांना, एकावेळी अनेक शत्रूंचा, अनेक आघाड्यांवर सामना करावा लागला. ज्ञान, गुण आणि चारित्र्यानं संपन्न असलेल्या संभाजी महाराजांनी हा सामना मोठ्या धैर्यानं केला.

छत्रपती संभाजी महाराज इतके शूर, पराक्रमी होते की, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्यातला एकही किल्ला, स्वराज्याची एक इंच जमीन शत्रूकडे जाऊ दिली नाही. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी जगले आणि स्वराज्यासाठी त्यांनी आपला देह ठेवला. संभाजी महाराज स्वराज्यासाठी हुतात्मा झाले. या ऐतिहासिक हौतात्म्याचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं, जागतिक दर्जाचं, भव्य, प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.”

वढु बुद्रुक गावाचा आणि परिसराचा विकास राज्य शासनाच्या माध्यमातून करणार

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या ऐतिहासिक तुळापूर गावात, छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा देह ठेवला, अखेरचा श्वास घेतला. तुळापूरपासून जवळ, शिरुर तालुक्यातल्या, वढु बुद्रुक गावी, छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वढू बुद्रुकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याठिकाणी आपला देह ठेवला, जिथं महाराजांनी अखेरचा श्वास घेतला, त्या ऐतिहासिक तुळापूर गावाचा, तसंच, जिथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, त्या वढु बुद्रुक गावाचा आणि परिसराचा विकास राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, पराक्रमाचा, ज्ञान, गुण, चारित्र्यसंपन्नतेचा, स्वराज्यभक्तीचा इतिहास सांगणारं, जागतिक दर्जाचं, भव्य स्मारक, वढू बुद्रुक इथं, महाराजांच्या समाधीस्थळी राज्य शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे, असेही संभाजी महाराज पुढे म्हणाले.

समाधीस्थळाच्या आजूबाजूला झाडे लावणार

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या आजूबाजूला जंगलातील झाडे लावण्यात येणार आहेत. डोंगराळ प्रदेशातील अंतर्देशीय सरोवरे व पाणवठ्यांमुळे चिंच, करंज, गोरखचिंच, तुती, आंबा, फणस, कवठ, कमरख, बोर, आसन अशाप्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यास वाव असल्याने तशा पद्धतीनं वृक्षारोपण करणं. ही झाडे त्या भागात प्रचलित असलेल्या परिसंस्थेसाठी अन्नाचे स्त्रोत बनतील. यासोबतच बांबूच्या झाडांच्या लागवडीमुळे दंडकारण्य विकसीत होईल.

या शक्यतांव्यतिरिक्त देशी झाडांच्या लागवडीला, संगोपनाला चालना देण्यासाठी वनस्पती रोपवाटिकेचा विकास करणे. उपरोक्त विकास कामासाठी समाधीस्थळ व भौतिक सुविधा पुरविण्यासाठी एक विशेष कार्यक्रम-योजना राबविण्यात येईल व त्यासाठी अंदाजे रु. 150 कोटी इतका निधी आवश्यक असून तो टप्याटप्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनावेळी सांगितले. (State government will develop the tomb area of Chhatrapati Sambhaji Maharaj’s Vadu Budruk)

इतर बातम्या

मोठी बातमी! सकाळी राणे म्हणाले नितेश सिंधुदुर्गात, मग रात्री गोवा विमानतळावर कुठून आले?

Mumbai | रुग्णवाढीची धास्ती, पालिका मुख्यालयात आढावा बैठक, नियम कठोर करण्यासोबतच आयुक्त काय म्हणाले?