मालेगाव खटल्याच्या निकालापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांची एका वाक्यात प्रतिक्रिया…निकालाबाबत कोर्टात काय घडले?

मालेगाव शहरात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटला एनआयए कोर्टाचे न्यायाधीश एल. के. लाहोटी यांच्यासमोर सुरु आहे. या खटल्यात सरकारी वकिलांनी ३२३ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवले आहे. त्यापैकी ३४ साक्षीदार फितूर झाले आहेत.

मालेगाव खटल्याच्या निकालापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंह यांची एका वाक्यात प्रतिक्रिया...निकालाबाबत कोर्टात काय घडले?
Sadhvi Pragya
| Updated on: May 08, 2025 | 1:02 PM

मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्बल १७ वर्षांनी गुरूवारी ८ मे रोजी जाहीर होणार होता. यापूर्वी, १९ एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. परंतु आजही निकाल देण्यात आला नाही. निकालासाठी पुढील तारीख दिली गेली आहे. या निकालाबाबत बॉम्बस्फोट खटाल्यातील आरोपी स्वाध्वी प्रज्ञा यांनी एका ओळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपला ‘सत्यमेव जयते’वर पूर्ण विश्वास आहे, असे म्हटले आहे.

मालेगावातील एका धार्मिक स्थळाबाहेर २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ६ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच १०१ जण जखमी झाले होते. या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्बल १७ वर्षांनी गुरूवारी येणार होता. १ लाखापेक्षा जास्त पाने असल्याने अभ्यास करायला वेळ लागणार आहे. त्यामुळे या खटल्याचा निकालासाठी आता ३१ जुलैची पुढील तारीख देण्यात आली आहे. आतापर्यंत कोर्टात या प्रकरणात आरोपी साध्वी प्रज्ञा, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर दिव्वेदी यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे.

निकालाच्या पूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले की, कोणावर अन्याय होणार नाही, अशी मला अशा आहे. माझा सत्यमेव जयतेवर पूर्ण विश्वास आहे. देशात देशभक्त राहिला पाहिजे, गद्दार नाही. पूजा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, त्यात अडथळा आणणे हक्क नाही. काँग्रेसने शहीद जवानांचा नेहमी अपमान केला. मात्र, भाजपने शहीद जवानांना सन्मान दिला आहे. नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांचा आहे. या भारतामध्ये आम्ही कोणाला छेडत नाही आणि आम्हाला छेडल तर त्याला सोडत नाही.

मालेगाव खटल्याची पार्श्वभूमी अशी

मालेगाव शहरात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटला एनआयए कोर्टाचे न्यायाधीश एल. के. लाहोटी यांच्यासमोर सुरु आहे. या खटल्यात सरकारी वकिलांनी ३२३ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवले आहे. त्यापैकी ३४ साक्षीदार फितूर झाले आहेत. या खटल्यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चुतर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात हत्येशी संबंधित दहशतवाद विरोधी कायदा आणि युएपीए अंतर्गत खटला चालला. या खटल्यात श्याम साहु, प्रवीण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे हे आरोपी फरार घोषित करण्यात आले.