मुंबईतील महिलांसाठी ‘बेस्ट’कडून खास गिफ्ट

| Updated on: Jul 23, 2019 | 11:08 PM

महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता खास महिलांसाठी बेस्ट प्रशासनातर्फे येत्या तीन महिन्यात तेजस्विनी बस सुरु करण्यात येणार आहे.

मुंबईतील महिलांसाठी बेस्टकडून खास गिफ्ट
Follow us on

मुंबई : महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता खास महिलांसाठी बेस्ट प्रशासनातर्फे येत्या तीन महिन्यात तेजस्विनी बस सुरु करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात बेस्टच्या ताफ्यात एकूण 37 तेजस्विनी बसगाड्या दाखल होणार आहे. या सर्व मिनी बस प्रकरातील आहेत. आज (23 जुलै) बेस्ट समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे.

महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता महिलांसाठी बस सेवा सुरु करण्याची अशी मागणी सातत्याने केली जाते. त्यानुसार ठराविक वेळेला विशेष बस सोडण्यात येतात. मात्र आता संपूर्ण दिवस महिला प्रवाशांसाठी बस चालवण्याची मागणी महिलांकडून होत होती.

त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या तेजस्विनी योजनेअतंर्गत महिलांसाठी खास बससेवा सुरु करण्यात येणार आहे. या बस खरेदी करण्यासाठी तेजस्विनी योजनेअतंर्गत मिळणारा निधी वापरला जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून 11 कोटींचा निधी मिळाला असून त्यातून 37 मिनी बसगाड्या घेण्यात येणार आहे.

या बसगाड्या दिवसभर फक्त महिलांसाठीच चालणार आहेत. सध्या बेस्टकडे असलेल्या महिला बस वाहक या बससाठी वापरण्याची प्रयत्न आहे. अन्यथा पुरुष कर्मचारी या बसवर असतील. बेस्टच्या 26 आगारामार्फत या बस चालवण्यात याव्यात, असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी प्रशासनाला दिले.

या बसगाड्या मिडी व डिझेलवर चालणाऱ्या आहेत. यातील एका बसची किंमत 29 लाख 50 हजार आहे. या सर्व बस व्ही.ई कंपनीच्या आहे. तसेच या 37 बस ऑटोमेटिक असणार असून या सर्व बस जास्त महिला प्रवाशी असलेल्या मार्गांवर चालवण्यात येणार आहे.