TRP Scam : अर्णब गोस्वामींकडून BARC च्या माजी सीईओला लाच, मुंबई पोलिसांचा कोर्टात दावा

| Updated on: Dec 29, 2020 | 12:45 PM

अर्णव गोस्वामींनी टीआरपी वाढवण्यासाठी लाच (Fake TRP) दिली, असं मुंबई पोलिसांनी कोर्टात लिखित स्वरुपात नमूद केलं.

TRP Scam : अर्णब गोस्वामींकडून BARC च्या माजी सीईओला लाच, मुंबई पोलिसांचा कोर्टात दावा
अर्णब गोस्वामी
Follow us on

TRP scam  मुंबई : TRP घोटाळ्यात जामिनावर सुटलेले रिपब्लिक चॅनलचे (Republic Channel TRP Scam) संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांच्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार आहे. याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे. सोमवारी 28 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत, अर्णव गोस्वामींनी टीआरपी वाढवण्यासाठी लाच (Fake TRP) दिली, असं मुंबई पोलिसांनी कोर्टात लिखित स्वरुपात नमूद केलं. याप्रकरणात नुकतंच मुंबई पोलिसांनी रेटिंग एजन्सी BARC चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता (Partho Dasgupta) यांना 24 डिसेंबरला अटक केली होती. पार्थो दासगुप्ता हेच TRP घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा दावा मुंबई पोलिसांचा आहे. (trp scam Mumbai police claim , Arnab Goswami paid to BARC ex CEO Partho Dasgupta to rig TRP)

मुंबई पोलिसांनी कालच्या सुनावणीत अनेक महत्त्वाचे दावे केले. अर्णब गोस्वामींनी टीआरपी वाढवण्यासाठी पार्थो दासगुप्तांना रोख पैसे, परदेश टूर, महागड्या वस्तू, दागदागिने दिल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु असलेल्या टीआरपी घोटाळ्यात मोठा खुलासा करण्यात आला आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी चार दिवसापूर्वी अनेक खुलासे केले आहेत. त्याचवेळी या घोटाळाच्या मास्टरमाईंड असलेल्या बार्कच्या माजी सीईओला सुद्धा मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई पोलिसांचे महत्त्वाचे दावे

बार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचा मास्टरमाईड

टीआरपी घोटाळ्याला बार्कचे माजी अधिकारीच जबाबदार

2016 ते 2019 च्या काळातल्या टीआरपी रेटिंगमध्ये छेडछाड झाल्याचा दावा

TRP घोटाळ्याचा भांडाफोड

मुंबई पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात TRP घोटाळ्याचा भांडाफोड केला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनल, बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी या चॅनलची नावं जाहीर केली होती. मात्र या सगळ्या घोटाळ्याचा टीआरपी मोजणाऱ्या बार्क या संस्थेचे काही वरिष्ठ माजी अधिकारीच जबाबदार असल्याचे स्पष्ट झालं आहे. बार्कचे COO रोमिल रामगडिया आणि सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या अटकेनंतर एकच खळबळ उडाली.

पार्थो दासगुप्ता मास्टरमाईंड?

बार्कचा माजी सीईओ पार्थो दासगुप्तानेच बार्कच्या आणखी काही लोकांना हाताशी धरुन, आरोपी चॅनेल्सशी हातमिळवणी केली आणि हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. 2016 आणि 2019 या कार्यकाळात पार्थो दास गुप्तांने टीआरपी घोटाळा केल्याचा संशय आहे. आता टीआरपीतल्या फेरफारीतील चौकशी करण्यासाठी एक थर्ड पार्टी कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या समितीने 44 आठवड्यांनी त्यांचा एक अहवाल सादर केला. त्यामधून काही चॅनेल्सचा टीआरपी अचानक वाढला असून तो संशयास्पद असल्याचं सिद्ध झालं.

मुंबई पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितल्याप्रमाणे हा सगळा घोटाळा आधीपासूनच प्लॅन केला होता. त्यानुसार एक नंबरला असलेल टाइम्स नाऊ हे चॅनेल दोन नंबरला आणून, एक नंबरला रिपब्लिक आणायचं असं त्यावेळी बार्कने ठरवलेलं होतं. त्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची देवाण-घेवाण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या सगळ्या तपासामध्ये आतापर्यंतच्या आणखी काही मनोरंजन विश्वातली चॅनेल्स रडार’वर असल्याचंही सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 2016 ते 2019 या सगळ्या दरम्यान जे टीआरपी रेटिंग माध्यमांचे दाखवले जात होते, ते खरेच होते का असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला आहे.

काल कोर्टात काय घडलं?

मुंबई पोलिसांनी पार्थो दासगुप्ताला कोर्टात हजर करुन त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी कोर्टाला सांगितलं, “दासगुप्तांनी रिपब्लिक भारत हे हिंदी चॅनल आणि रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी, अर्णब गोस्वामींसह कट रचला. याबदल्यात अर्णब गोस्वामींनी दासगुप्ताला लाखो रुपये दिले. दासगुप्तांनी या पैशातून महागड्या वस्तू आणि दागिने खरेदी केली. त्यांच्या घरातून 1 लाख रुपयांचं घड्याळ आणि 3 किलो 300 ग्रॅम इतके सोन्याचे दागिने मिळाले”

अर्णबने दिलेल्या पैशातून दासगुप्ताने काय काय खरेदी केलं, त्यांच्यातील नेमका व्यवहार कसा झाला हे सर्व तपासण्यासाठी दासगुप्ताची कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी मुंबई पोलिसांनी केली. ती मान्य करण्यात आली. कोर्टाने दासगुप्तांची कोठडी 30 डिसेंबरपर्यंत वाढवली. पोलिसांनी दासगुप्ताकडून 2 मोबाईल, 1 आयपॅड आणि 1 लॅपटॉप जप्त केला आहे.

ई-मेल, व्हॉट्सअॅप चॅटमधून महत्त्वाचे धागेदोरे

पोलिसांना पार्थो दासगुप्ता आणि रोमिल रामगढिया यांच्यातील ई-मेल, व्हॉट्सअॅप चॅटमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. यामधूनच टीआरपीमध्ये छेडछाड झाल्याचं सिद्ध होतंय असं पोलिसांचं म्हणणं आहे. या चॅटमध्येही दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी यांचा उल्लेख आहे.

आतापर्यंत 15 जणांना अटक

TRP घोटाळ्यात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारच्या सुनावणीत पोलिसांनी पार्थो दासगुप्ताची कोठडी वाढवून मागितली. त्याचवेळी 11 जणांना वॉन्टेड आरोपी घोषित केलं. यामध्ये एका माजी सरकारी कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

आतापर्यंत रिपब्लिक टीव्हीचे डिस्ट्रिब्युशेन हेड घनश्याम सिंह आणि विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. तर प्रिया मुखर्जी, एस सुंदरम, शिवेंदु मुल्हेरकर आणि रणजीत वॉल्टर यांना वॉन्टेड घोषित केलं आहे.

सचिन वाझे यांच्या नेतृत्त्वात तपास

TRP घोटाळ्यात वरिष्ठ पोलीस सचिन वाझे यांच्या नेतृत्त्वात तपास होत आहे. सचिन वाझे यांनी केलेले दावे अत्यंत धक्कादायक आहेत. त्यानुसार “गोस्वामींनी दासगुप्ताला 2017 मध्ये तब्बल 6000 डॉलर म्हणजेच जवळपास साडेचार लाख रुपये दिले. लोअर परेलमधील स्टार हॉटेलमध्ये हा व्यवहार झाला. इतकंच नाही तर दासगुप्ताला सहकुटुंब स्वित्झर्लंड, डेन्मार्कची टूरही स्पॉन्सर केली. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये दासगुप्तांना रोख 20 लाख रुपये आणि 2019 मध्ये दहा लाख रुपये देण्यात आले”, असं वाझे यांनी सांगितलं.

गोस्वामींनी 2017 मध्ये रिपब्लिक वाहिनी लाँच केली. तेव्हा टीआरपीमध्ये छेडछाड करण्यासाठी त्यांनी दासगुप्तांची मदत घेतली, असंही वाझे यांनी सांगितलं. दासगुप्ता आणि गोस्वामी हे दोघे एकमेकांना 2004 पासून ओळखतात, असंही वाझे म्हणाले. या सर्व प्रकारात ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी दासगुप्ताला मदत केली, त्यांना त्या त्या वेळी बक्षिसी म्हणून, रोख रक्कम, महागड्या वस्तू देण्यात आल्या.

आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची नाव

आरोपींची नाव – अटकेची तारीख

1) विशाल वेद भंडारी – 7 ऑक्टोबर
2) बोंम्पेल्लीराव नारायण मिस्त्री – 7 ऑक्टोबर
3) शिरीष सतीश पट्टण शेट्टी – 8 ऑक्टोबर
4) नारायण नंदकिशोर शर्मा – 8 ऑक्टोबर
5) विनय राजेंद्र त्रिपाठी – 12 ऑक्टोबर
6) उमेश चंद्रकांत मिश्रा
7) रामजी दुधनाथ शर्मा
8) दिनेश पन्नालाल विश्वकर्मा
9) हरीश कमलाकर पाटील
10) अभिषेक कोलवडे
11) आशिष अबीदूर चौधरी – 28 ऑक्टोबर
12) घनश्याम सिंग
13) विकास खानचंदानी – 13 डिसेंबर

14) पार्थो दासगुप्ता – 24 डिसेंबर

15)

काय आहे प्रकरण?

“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल” अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टीआरपी म्हणजे काय?

टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (Television Rating Point ) असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. (BARC Fake TRP Racket Republic Channel 13 People  Arrest)

(trp scam Mumbai police claim , Arnab Goswami paid to BARC ex CEO Partho Dasgupta to rig TRP)

संबंधित बातम्या :

TRP Scam | रिपब्लिक चॅनलचे सीईओ विकास खानचंदानीला अटक, टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांची कारवाई

‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णव गोस्वामी यांना अटक

TRP Scam | टीआरपी घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक, आतापर्यंत 11 जण गजाआड