
मुंबई : काका-पुतण्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दुफळीचा इतिहास नवीन नाहीय. मात्र पक्षावरच दावा सांगणारे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातले पहिलेच पुतणे आहेत. आज ज्या घडामोडी राज्यात घडत आहेत, त्यावरुन दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. काय आहे तो व्हिडीओ आणि महाराष्ट्रात आतापर्यंत कोणकोणत्या काका-पुतण्यांमध्ये सामना रंगलाय.
बाप-बेट्यापेक्षा महाराष्ट्राचं राजकारण काका-पुतण्याच्या वर्तुळाभोवती जास्त फिरलंय. काका गोपीनाथ मुंडेंचं बोट धरुन पुतणे धनंजय मुंडेंचं राजकारण सुरु झालं. काका बाळासाहेब ठाकरेंकडून कुंचल्याचे फटकारे घिरवता-घिरवता पुतणे राज ठाकरेंची शैली घडली आणि काका शरद पवारांकडचा कामाचा उरक पुतणे अजित पवारांनी त्यांच्या राजकारणात आणला.
याआधी राजकारणातल्या दोन काका-पुतण्यांमधल्या नात्याचा हेवा वाटावा असं सख्य महाराष्ट्रानं पाहिलं. त्यानंतर राजकारणापायीच रक्ताच्या नात्यांमध्ये दुफळीही पाहिली. 2006 ला भांडण विठ्ठलाशी नाही, तर विठ्ठलाभोवतीच्या बडव्यांशी आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी काकांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. 2012 मध्ये वारसा कोण, म्हणून धनंजय मुंडेंनी काकांचं बोट सोडत राष्ट्रवादीची वाट निवडली आणि 2023 मध्ये सत्तेत की विरोधात या झगड्यात पुतणे अजित पवारांनी काका शरद पवारांचाच पक्ष फोडला.
या तिन्ही काका-पुतण्यांमधला फरक हा आहे की, धनंजय मुंडे राष्ट्रवादीत सामील झाले. राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि अजित पवारांनी मात्र थेट काकांच्या पक्षावरच दावा ठोकला. महाराष्ट्रात काका-पुतण्यांमध्ये राजकीय संघर्षाची परंपरा राहिलीय. पण त्या संघर्षाची धार काल-परवापर्यंत पवार काका-पुतण्यांनी त्यांच्या नात्याला लागू दिली नव्हती. अधून-मधून कार्यशैलीवरुन वार-पलटवार जरुर झाले, पण एक घाव-दोन तुकडे होण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा एक जुना बाईट समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला.
एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. त्यामुळे जेव्हा नेतृत्व किंवा वारस निवडण्याची वेळ येते., तेव्हा भावबंदकीचा वाद उफाळणार, हे भारतात रामायण-महाभारतापासून चालत आलंय. काका शरद पवारांविरोधात पुतणे अजित पवार…सध्या सुरु असलेला वाद जगजाहीर आहे. पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष बनल्या आणि त्याच्या महिन्याभरात अजित पवारांनी पक्ष फोडला.
काका बाळासाहेब ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे. पुत्र उद्धव ठाकरेंची कार्याध्यक्षपदी निवड झाली.. नंतर बाळासाहेबांभोवतीच्या काही लोकांच्या वागणुकीविरोधात राज ठाकरे बाहेर पडले, मात्र नेतृत्व राज ठाकरेंकडेचं पाहिजे होतं, असा तेव्हा राज समर्थकांचा सूर होता. काका गोपीनाथ मुंडे, पुतणे धनंजय मुंडे वारस कोण म्हणून संघर्ष झाला. कन्या पंकजा मुंडे राजकारणात उतरल्या आणि पुतणे धनंजय मुंडेंनी काकांची साथ सोडूत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
काका सुनिल तटकरे, पुतणे अवधूत तटकरे पुतण्या अवधूत तटकरेंना सुनिल तटकरेंचा वारस म्हणून पाहिलं जातं होतं. पण तटकरेंची कन्या आदिती तटकरे राजकारणात आल्या आणि पुतण्यानं आधी शिवसेना आणि नंतर भाजपमध्ये जाणं पसंत केलं. काका जयदत्त क्षीरसागर, पुतणे संदीप क्षीरसागर दाव्यानुसार बीडची जिल्हा परिषद पुतणे संदीप क्षीरसागरांनी ताब्यात घेतली. तिथून संघर्ष सुरु झाला नंतर पुतणे संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीत आले.
काका अनिल देशमुख, पुतणे आशिष देशमुख 2014 विधानसभा निवडणुकीत काका अनिल देशमुखांविरोधात भाजपनं पुतणे आशिष देशमुखांना तिकीट देऊन निवडून आणलं. तिथून उद्भवलेला संघर्ष आजही सुरुय. मुंडे-ठाकरे आणि पवार काका-पुतण्यांमधलं एक साम्य म्हणजे ते बाहेर पडले असले तरी ते आजही काकांना मानतात म्हणजे एकीकडे अजित पवार शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, असं म्हणतायत आणि दुसरीकडे त्यांच्या गटाचे प्रफुल्ल पटेल अध्यक्ष शरद पवारांच्या निर्णयांना अमान्य ठरवतायत.
ठाकरे-पवार काकांवरुन पुतणे राज ठाकरे आणि अजित पवारांमध्ये याआधी प्रचंड वादही झाला होता. काका-पुतण्यांची केमिस्ट्री महाराष्ट्राच्या राजकारणात फार काळ न टिकल्याचा इतिहास सांगतो. मात्र कालपर्यंत पवार काका-पुतण्यांची जोडी त्याला अपवाद होती. आजवर काका नरम आणि पुतणे गरम हे समीकरण राष्ट्रवादीत काम करत होतं.
पुतणे अजित पवारांचे याआधीचे बंड काका शरद पवारांनी मोठ्या शिताफीनं मोडून काढलेयत. मात्र यावेळेस शरद पवारांच्या अनेक शिलेदारांनी पुतणे अजित पवारांशी हातमिळवणी केलीय. शरद पवारांच्या गाठिशी ५० वर्षांच्या राजकारणाचा अनुभव आहे. दुसरीकडे पक्ष कोणताही असो सत्तेत फिट बसण्याचं कसब अजित पवारांनी अंगी बाणवलंय. समीकरणांच्या सर्व शक्यतांना सोबत घेऊन काका शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री राहिलेयत आणि पुतणे अजित पवारांनीही ४ पक्षांसोबत ४ वेळा उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम नावावर केलाय. धक्कातंत्र हा शरद पवारांच्या राजकारणाचा गुण आणि अवगणुही आहे.दुसरीकडे परिणांमाच्या चिंतेऐवजी एक घाव दोन तुकडे ही अजित पवारांच्या राजकारणाची स्टाईल राहिलीय. पुढे काय होतं ते महाराष्ट्र पाहतोच आहे.