मुंबई टार्गेटवर, विधानभवनासह 4 ठिकाणं बॉम्बने उडवण्याची धमकी, तपासात समोर आली मोठी माहिती

मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले असून नागरिकांना बाहेर काढले आहे.

मुंबई टार्गेटवर, विधानभवनासह 4 ठिकाणं बॉम्बने उडवण्याची धमकी, तपासात समोर आली मोठी माहिती
vidhan bhavan mumbai
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 12, 2026 | 10:33 AM

मुंबईतील विधानभवन परिसराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत विधानभवनातील कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढले. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आत येण्यास मनाई करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, एकीकडे इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेचा संघर्ष सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईतील विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना मुंबईतील विधानभवनाला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. मुंबईत विधानभवनासह मेट्रो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांना धमकी देणारा मेल आल्याचे बोललं जात आहे. हा मेल खलिस्तानी आंदोलकांशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. ही धमकी देणाऱ्याने मिसाईल आणि बॉम्बने संबंधित ठिकाण उडवून देण्याचे मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी मेल आल्यानंतर तात्काळ सुरक्षेच्या गृह विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण राज्याचा संपूर्ण अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जातो. यावर चर्चाही होते. आता काही वेळात चर्चेला सुरुवात होणार होती. त्यापूर्वीच ई-मेलद्वारे विधानभवन उडवून देऊ अशी धमकी भल्या पहाटे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाली आहे. तसेच पोलीसही सक्रीय झाले आहेत. या संपूर्ण परिसरातून नागरिक, इथे काम करणारे कर्मचारी त्यांना बाहेर काढले जात आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवा, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

तसेच प्रत्येक केबिनची चेकींग केली जात आहे. कुठे काही संशयास्पद गोष्टी आढळतात का, याची झाडाझडती घेतली जात आहे. तसेच जे लोक बाहेरुन येतात, त्यांचेही पास बंद केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्ष यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवा, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत.

त्यासोबत बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच डॉग स्कॉड पथकालाही बोलवण्यात आले आहे. या संपूर्ण परिसराची सध्या तपासणी केली जात आहे. या ठिकाणी काही संशयास्पद वस्तू आढळतात का, याचीही पाहणी केली जाणार आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. दक्षता घेऊन सध्या सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

राम शिंदे काय म्हणाले?

आमदार राम शिंदे यांनी विधानभवनात आलेल्या धमकीच्या मेलबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आज सकाळी ६:५७ मिनिटांनी सीपीएच्या (CPA) अधिकृत ईमेलवर ही धमकी प्राप्त झाली होती. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथकाद्वारे संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. या ईमेलमध्ये विधानभवनासह बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हायकोर्ट, मेट्रो आणि काही बँकांना उडवून देण्याचा उल्लेख होता. सुरक्षा अधिकारी आणि तपास यंत्रणांच्या सविस्तर चर्चेनंतरच विधानभवनात प्रवेश देण्यात आला आहे. विधानसभा ९:४५ वाजता तर विधान परिषद १० वाजता सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून आवश्यक ती सर्व सुरक्षात्मक पावले उचलली जात आहेत.

 नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही – पंकज भोयर

आमदार पंकज भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ईमेल सकाळी ६.५७ ला प्राप्त झाला होता आणि पोलीस प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली आहे. प्राथमिक तपासात हा ईमेल खोटी (Hoax) असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून अशा प्रकारचे कृत्य केले जाण्याची शक्यता असून हा ईमेल नेमक्या कोणाच्या आयडीवरून आला, याचा शोध सायबर सेल आणि पोलीस घेत आहेत. सध्या सर्व संबंधित ठिकाणी सुरक्षा तपासणी पूर्ण झाली असून घाबरण्यासारखी कोणतीही स्थिती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Follow Us