Vidhan Parishad : विधान परिषदेसाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग; उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी कोणता चेहरा सर्वात समोर? या नेत्याला लॉटरी?

Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्याऐवजी या तीन चेहऱ्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. या तीन नेत्यांपैकी एकाने रश्मी ठाकरे यांच्याकडे विधान परिषदेच्या तिकीटाची मागणी केल्याचे समजते.

Vidhan Parishad : विधान परिषदेसाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग; उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी कोणता चेहरा सर्वात समोर? या नेत्याला लॉटरी?
विधान परिषद निवडणूक शिवसेना
Image Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Apr 22, 2026 | 10:10 AM

Sushma Andharey-Vaibhav Naik-Ambadas Danve: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागी आली आहे. त्या जागेसाठी उद्धव सेनेच्या गोटातून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काही नेत्यांनी थेट मातोश्रीवर लॉबिंग सुरू केली आहे. उद्धव सेनेतून या तीन चेहऱ्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातील एका नेत्याने रश्मी ठाकरे यांना विधान परिषदेसाठी गळ घातल्याचे समजते. उद्धव ठाकरे जर विधान परिषदेवर जाणार नसतील, तर महाविकास आघाडीतील सत्ता समीकरणं बदलतील का? अशी चर्चा सुरू असतानाच आमदारकी पदरात पाडून घेण्यासाठी काही नेत्यांनी मातोश्रीवर वजन वापरण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.

सुषमा अंधारे विधान परिषदेच्या मैदानात

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे नाव आघाडीवर मानले जाते. त्यांनी मातोश्रीवर लॉबिंग सुरू केल्याचा दावा करण्यात येत आहे. सुषमा अंधारे यांनी आमदारकीसाठी रश्मी ठाकरे यांना गळ घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतरही इच्छुक सक्रिय झाले आहेत. त्याचवेळी अंधारे यांनी त्यांची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. महाविकास आघाडीतील एकमेव जागेसाठी आता वरिष्ठ नेत्यांमार्फत उद्धव सेनेचे शिलेदार त्यांची उमेदवारी पक्की करण्यासाठी पुढे आले आहेत.

वैभव नाईक, अंबादास दानवे यांचे नावही आघाडीवर

तर वैभव नाईक आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पण विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यामार्फत किल्ला लढवायला सुरूवात केल्याचे समजते. तर उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेवर जावं यासाठी सर्व वरिष्ठ नेते आग्रही असल्याचे समजते. उद्धव ठाकरे हे जर इच्छुक नसतील तर आपले नाव समोर असावे यासाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. या मोर्चेबांधणीत कुणाला यश मिळते हे लवकरच समजेल. तूर्तास कुणाला विधान परिषदेवर पाठवायचे याविषयी कोणताही निर्णय झालेला नाही.

विधान परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार, भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडीकडे 1 जागा येणार आहे. त्यात जर उद्धव ठाकरे निवडणूक लढणार नसतील तर महायुती मोठा गेम करण्याची भीती आहे.

Follow Us