
शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि करारी पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले वरिष्ठ आयपीएस ऑफिसर म्हणजे विश्वास नांगरे पाटील

26/11 रोजी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये दहशतवादी घुसले असताना जीवाची पर्वा न करता आत शिरलेल्या जिगरबाज पोलीसांमध्ये नांगरे पाटीलही होते. कडक शिस्तीच्या विश्वास नांगरे पाटील यांच्या मिशा नेहमी ‘वर’ असल्याचं म्हटलं जातं, मात्र कुटुंबीयांमध्ये रमताना ते कसे असतात, त्यांच्या मुलांचं-पत्नीचं त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे, विश्वास नांगरे पाटील यांचं लग्न कसं जुळलं, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

आता त्यांच्या पत्नी रुपाली नांगरे पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुकवर खास पोस्ट शेअर केली आहे.

‘माझ्या पाठीशी नेहमीच उभी राहणारी आणि माझं सामर्थ्य असलेल्या रुपालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… तू चांगल्या आणि वाईट वेळेत माझ्या पाठीशी उभी राहिली आहेस. जेव्हा सर्व जगाचा विरोध असतो तेव्हा तू नेहमीच माझ्याबरोबर असतेस. तू आशा, प्रेम आणि सामर्थ्य आहेस, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’ असं कॅप्शन देत त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत.

विश्वास नांगरे पाटील यांचा विवाह 2000 मध्ये झाला. अरेंज मॅरेज की लव्ह असा प्रश्न एका कार्यक्रमात त्यांना विचारल्यावर पत्नी रुपाली नांगरे पाटील यांनी पटकन ‘अरेंज’ असं उत्तर दिलं. त्यावर साखरपुड्यापर्यंत अरेंज होतं, नंतर सहा महिने मिळाल्याने लव्ह झालं, अशी खट्याळ प्रतिक्रिया विश्वास नांगरे पाटलांनी दिली होती.