त्या व्हिडीओमुळे रातोरात आयुष्य… ‘चिकन लेग पीस मॅन’ उल्हास कामटे कोण आहेत? महिन्याची कमाई किती?

'चिकन लेग पीस मॅन' उल्हास कामटे यांच्या मृत्यूच्या अफवांवरून पडदा उचलणारा हा लेख त्यांची खरी कहाणी सांगतो. व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर त्यांना हार्ट अटॅक नव्हे, तर एंग्झायटी अटॅक आला होता. टिकटॉकवरून प्रसिद्ध झालेल्या उल्हास कामटे यांचा प्रवास, त्यांचे रेस्टॉरंट आणि महिन्याची लाखो रुपयांची कमाई याचा घेतलेला हा आढावा.

त्या व्हिडीओमुळे रातोरात आयुष्य... चिकन लेग पीस मॅन उल्हास कामटे कोण आहेत? महिन्याची कमाई किती?
Ulhas Kamathe
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 12:28 PM

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि ‘चिकन लेग पीस’वाले म्हणून फेमस असलेले उल्हास कामटे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. उल्हास कामटेला हार्ट अटॅक आला असून त्याचा मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात सुरू होती. पण उल्हास कामटेनेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून आपण जिवंत आहोत. मृत्यूच्या बातम्या सर्व अफवा असून व्हायरल होणारा व्हिडीओ जुना असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे उल्हासच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पण गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण मीडिया आणि सोशल मीडियात चर्चेत असलेला उल्हास कामटे नेमका कोण आहे? त्याला एवढी प्रसिद्ध कशी मिळाली? याचाच घेतलेला हा मागोवा.

हॉरर सिनेमा पाहिला अन्…

उल्हास कामटे हे काही दिवसांपूर्वी ‘झाड फुंक’ या हॉरर सिनेमाच्या प्रीमियरला गेले होते. खरं तर ते जाणारच नव्हते. त्यांना हॉरर सिनेमांची भीती वाटत असल्याने ते टाळत होते. पण मित्राने आग्रह केल्याने ते सिनेमा पाहण्यासाठी गेले. पण तिथे गेल्यावर सिनेमातील एक भयावह सीन पाहिल्यावर ते इतके घाबरले की जागीच बेशुद्ध पडले. त्यांना पॅनिक अटॅक आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या मित्रांनी त्यांना तात्काळ कोकिला बेन रुग्णालयात नेलं. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि काही वेळानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांना हार्ट अटॅक आला नव्हता, तर एंग्झायटी अटॅक आला होता. हा अटॅक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेताना कुणी तरी व्हिडीओ तयार केला. तोच व्हिडीओ परत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उल्हासच्या मृत्यूची अफवा उठली. त्यावर उल्हासला खुलासा करावा लागला आहे.

Loading...

 

कोण आहेत उल्हास कामटे?

उल्हास कामटे हे एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि युट्यूबर आहेत. इंटरनेटवर त्यांना ‘चिकन लेग पीस मॅन’च्या नावाने ओळखलं जातं. खास अंदाजात चिकन आणि मटन खातानाचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळेच ते ‘चिकन लेग पीस मॅन’ म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.

2018मध्ये टिकटॉकवर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात तो चिकन लेग पीस खाताना दिसत आहे. खास अंदाजात खाताना आपल्या विशिष्ट शैलीत बोलताना तो दिसत आहे. त्याची ही स्टाइल लोकांना इतकी आवडली की त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे तो रातोरात घराघरात लोकप्रिय झाला.

त्यानंतर त्याचे इतर व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत गेले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली. फूड ब्लॉगर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. इन्स्टाग्रामसहीत असंख्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे लाखो चाहते आहेत.

त्यांनी ‘चिकन लेग पीस’ नावाचं एक रेस्टॉरंट घाटकोपरमध्ये सुरू केलेलं आहे.

एका रिपोर्टनुसार, उल्हास कामटे सोशल मीडियाच्या माध्यमातून 3 ते 4 लाख रुपये कमावतात. सोशल मीडियावर त्यांचे 2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियाशिवाय त्यांची मुंबईत जिम आहे. इतर व्यवसायही आहेत. त्यांनी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध व्यक्तींसोबत काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us