अखेर स्वप्न सत्यात उतरणार, बीडीडीवासीयांना आज घरांचं चावी वाटप, आदित्य ठाकरे अनुपस्थितीत राहणार?

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५६ कुटुंबांना आज नवीन घरांच्या चाव्या मिळणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या दोन इमारतींमधील सदनिकांचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रण आहे, परंतु त्यांना बोलण्याची परवानगी नाही अशी माहिती आहे.

अखेर स्वप्न सत्यात उतरणार, बीडीडीवासीयांना आज घरांचं चावी वाटप, आदित्य ठाकरे अनुपस्थितीत राहणार?
| Updated on: Aug 14, 2025 | 9:05 AM

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५६ रहिवाशांच्या प्रशस्त घरात राहण्याचे स्वप्न आज प्रत्यक्षात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने उभारलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. आज गुरुवारी सकाळी ११ वाजता माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिरात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमावेळी बीडीडीकरांना चाव्या वाटप केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मात्र बोलण्यास मनाई?

या कार्यक्रमाचे निमंत्रण स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनाही देण्यात आले आहे. वरळी आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा परिसर त्यांच्या मतदारसंघात येतो. हा प्रकल्प आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. कारण त्यांनी नियमितपणे या प्रकल्पाची पाहणी करून रहिवाशांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला होता. गणेशोत्सवापूर्वी रहिवाशांना नव्या घरांचा ताबा मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यामुळे आता आदित्य ठाकरे या कार्यक्रमात उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही समोर आली आहे. यावर वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५५६ पुनर्वसन सदनिकांचा वितरण सभारंभ असे नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच या कार्यक्रमाला मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, डॉ. पंकज भोयर, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार आदित्य ठाकरे आणि महेश सावंत यांची विशेष उपस्थिती असणार आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे.

मात्र या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंना बोलण्यासाठी वेळ दिला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

वरळी बीडीडीतील रहिवाशांचे पुनर्वसन

वरळी, ना. म. जोशी मार्ग, नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ ऑगस्ट २०२१ रोजी या प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता. यामुळे गेली १०० वर्षे १६० चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या रहिवाशांना आता ५०० चौरस फुटांच्या अलिशान 2BHK घरात राहता येणार आहे.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात एकूण १२१ जुन्या चाळींतील ९,६८९ रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. म्हाडातर्फे येथे ४० मजल्यांच्या ३४ पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. या प्रकल्पाअंतर्गत जांबोरी मैदान आणि डॉ. आंबेडकर मैदानाचे जतन केले जाणार आहे. जुन्या चाळीतील एका इमारतीचे जैसे थे जतन करून तेथे संग्रहालय उभारले जाणार आहे. डिसेंबरपर्यंत वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील तिन्ही बीडीडी चाळ प्रकल्पांमध्ये ३,९८९ पुनर्वसन सदनिका पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ना. म. जोशी मार्ग येथे १४ आणि नायगाव येथे २० इमारतींचे बांधकाम सुरू आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील इमारत क्र. १ मधील डी आणि ई विंगमधील रहिवाशांना आज घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील.