मुंबईच्या इक्षु शिंदे यांचा ‘ग्लोबल फ्यूचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’ ने सन्मान

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असलेल्या इक्षु शिंदे यांचा अमेरिकेतील गॅरीबे इन्स्टिट्यूटने  ‘ग्लोबल फ्यूचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’ ने सन्मान केला आहे.

मुंबईच्या इक्षु शिंदे यांचा ‘ग्लोबल फ्यूचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’ ने सन्मान
Ikshu Shinde
| Updated on: Nov 22, 2025 | 9:37 PM

मुंबईतील इक्षु शिंदे यांची अमेरिकेतील गॅरीबे इन्स्टिट्यूट फॉर सॉफ्ट पॉवर आणि पब्लिक डिप्लोमसी या संस्थेमार्फत ग्लोबल फ्यूचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’ म्हणून निवड झाली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यास आणि समाजहिताची जाण यांचा समतोल साधणाऱ्या इक्षु यांना हा सन्मान त्यांच्या अभ्यासू कार्यशैली आणि कल्पक दृष्टिकोनामुळे देण्यात आला. इक्षु शिंदे यांना मिळालेला हा सन्मान महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असलेल्या इक्षु यांनी शाळेतील शैक्षणिक कामगिरीसोबत सामाजिक सहभागातही आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील निवडणूकी दरम्यान मतदार जागृती उपक्रम राबवल होता. त्यासाठी कार्यशाळा आणि रॅलींचे आयोजन केले होते. या मोहिमेद्वारे ८,००० हून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचत त्यांनी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमही राबवले आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासोबतच कलाविश्वातही इक्षुचे योगदान आहे. इक्षु यांनी सुमारे एका दशकापासून भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रीय आणि समकालीन नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. गुरु आदिती भागवत यांच्याकडे जयपुर घराणे शैलीच्या कथ्थक कलेचे तसेच सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक Ashley Lobo यांच्या मार्गदर्शनाखाली द डान्सवर्कस या संस्थेत बॅले, झॅज, हिप हॉपचे धडे घेतले आहेत. प्रोफेशनल डान्स सर्टिफिकेशन प्रोग्रॅम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी आपले नृत्य सादर केले आहेत. CID–UNESCO (United Nations International Dance Council) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेच्या त्या सदस्य आहेत.

 गॅरीबे इन्स्टिट्यूटचे मानले आभार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरच्या वंशज असलेल्या आणि समाजकारणाचा वारसा लाभलेल्या इक्षू शिंदे यांनी हा सन्मान स्वीकारतांना गॅरीबे इन्स्टिट्यूटचे आभार मानले आणि त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. इक्षु यांच्यात विश्लेषणात्मक विचार आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे प्रभावी मिश्रण आहे. नैतिक आणि बौद्धिक चौकट घडवणाऱ्या पुढील पिढीतील जागतिक नेतृत्वात त्या महत्त्वाची भूमिका बजावतील,” असे संस्थेने इक्षु यांच्या निवडीविषयी बोलताना सांगितले.