
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या बैठकीत नवीन नागपूरच्या विकासाला गती देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत एकूण २१ महत्त्वाच्या विषयांना मान्यता देण्यात आली. ज्यामध्ये नवीन नागपूरसाठी स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आणि परिवहन उपक्रम कंपनी स्थापन करण्याचा समावेश आहे. राज्य सरकारकडून नवीन नागपूरच्या रहिवाशांना ही विकासाची मोठी दिवाळी भेट मानली जात आहे.
प्राधिकरणाच्या मालकीच्या तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्यासाठी स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा निर्णय नागपूर महानगर प्रदेशासाठी फार महत्त्वाचा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन नागपूरमधील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. या ठिकाणी रस्ते बाह्यवळण मार्गाला तातडीने जोडण्यात यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, भविष्यात हा बाह्यवळण मार्ग ‘मल्टिमॉडल कॉरिडॉर’मध्ये रुपांतरित होणार असल्याने, त्यासाठी आतापासूनच योग्य तरतूद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नागपूर महानगर प्रदेश हद्दीतील वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी, सार्वजनिक व खासगी वाहतुकीत समन्वय साधण्यासाठी आणि नवीन व फिडर मार्गाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र नागपूर महानगर परिवहन उपक्रम कंपनी स्थापन करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. या कंपनीच्या स्थापनेमुळे नागपूरकरांना अधिक कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
Transforming Nagpur for the Future!
Chaired a meeting of the Nagpur Metropolitan Region Development Authority, approved a dedicated Asset Management Company to efficiently manage existing and upcoming properties.
Directed the integration of New Nagpur’s roads with the Outer… https://t.co/KinZ59znIx
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 20, 2025
याबैठकीत मान्यता मिळालेल्या अन्य प्रमुख विषयांमध्ये नागपूर महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणे, नागपूरमधील तुरूंगासाठी जागा हस्तांतरित करणे, प्राधिकरणात सामाजिक उत्तरदायित्व निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणे, दीक्षाभूमीचे उर्वरित काम पूर्ण करणे आणि प्राधिकरणाचा १५६ पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणे, यांचा समावेश आहे. तसेच, नागपूर महापालिका क्षेत्रातील प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसाठी नागपूर सुधार प्रन्यासला कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त करण्याची मान्यता देण्यात आली.