Nagpur News : नागपुरात पुराचा तडाखा, 80 वर्षीय आज्जींची सुटका; मुलांना कपाटावर बसवून आईने वाचवलं

मुसळधार पावसाने नागपूरमध्ये अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त केला. कुठे वृद्धांना जीव धोक्यात घालून बाहेर काढावं लागलं, तर कुठे आईने मुलांचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष केला. पुराचं पाणी ओसरलं असलं तरी नागरिकांसमोर नुकसान भरून काढण्याचं मोठं संकट उभं आहे.

Nagpur News : नागपुरात पुराचा तडाखा, 80 वर्षीय आज्जींची सुटका; मुलांना कपाटावर बसवून आईने वाचवलं
नागपूरमध्ये पुरातून वृद्ध आजीचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन
| Updated on: Jul 29, 2026 | 1:20 PM

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरमधील अनेक भागांमध्ये फटका बसला. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे नागपूरमधील अनेक भागांत पाणी साचलं, काही ठिकाणी अचानक पूरस्थिती निर्माण झाली. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. पुराचे पाणी ओसरले असले तरी नुकसान भरून काढण्याचे मोठे आव्हान नागरिकांसमोर उभे आहे. या पावसामुळे नागरिकांची दैना उडाली असून त्यांचं बरंच नुकसानही झालं, यामुळे मोठी खळबळ माजली.

अडकली 80 वर्षांची आज्जी

स्वरूप नगर परिसरातील हितेश मेहता यांच्या घरात दुपारी तीनच्या सुमारास अचानक पाणी शिरण्यास सुरुवात झाली. काही वेळातच घरात कमरेपर्यंत पाणी साचल्याने ८० वर्षीय कुंता मेहता, त्यांची सून आणि लहान नात घरात अडकून पडल्या. परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे कुटुंबातील पुरुष सदस्य घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. अखेर नातेवाईकांनी NDRF आणि अग्निशमन विभागाशी संपर्क साधल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास बचावकार्य सुरू करण्यात आले.

थरारक बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

NDRF आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी कुंता मेहता यांना खुर्चीवर बसवून सुरक्षितपणे घराबाहेर काढले. या थरारक बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पुराच्या पाण्यामुळे घरातील धान्य, कपडे, पुस्तके, फ्रीजसह इतर घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुमारे तीन फुटांपर्यंत पाणी घरात शिरल्याने मेहता कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुलांना वाचवण्यासाठी आईने कपाटावर बसवलं

दरम्यान, शहरातील इतर भागांमध्येही पुराचा फटका नागरिकांना बसला. शितल शेंडे या आपल्या लहान मुलांसोबत घरी एकट्याच असताना त्यांच्या घरातही अचानक पाणी शिरले. काही वेळातच कमरेपर्यंत पाणी साचल्याने परिस्थिती गंभीर बनली. पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी त्याला कपाटावर बसवले. मदतीची वाट पाहत त्या अनेक तास घरात अडकून राहिल्या.

पूराच्या पाण्यामुळे शितल शेंडे यांच्या घरातील कपडे, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. परिस्थिती इतकी बिकट होती की कुटुंबाला उपाशी झोपण्याची वेळ आली. संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पूर ओसरल्यानंतर आता घर पुन्हा उभे करण्याचे आणि संसार सावरण्याचे मोठे आव्हान त्यांच्या कुटुंबासमोर उभे आहे. मुसळधार पावसानंतर नागपूरमधील अनेक वस्त्यांमध्ये अजूनही नुकसानाचे पंचनामे, मदत आणि पुनर्वसनाची नागरिकांकडून मागणी केली जात असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us