एका चिप्सच्या पॅकेटमुळे बलात्काराच्या गुन्ह्याची उकल, AIची मदत अन्… नागपूर पोलिसांनी लढवली शक्कल
नागपूरमध्ये भिक्षेकरी महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने शहर हादरले. पोलिसांनी आधुनिक AI तंत्रज्ञानाचा, विशेषतः 'MARVEL' प्रणालीचा वापर करून गुन्ह्याचा तपास केला. घटनास्थळावरील चिप्सच्या पॅकेटच्या तुकड्यावरून आरोपीचा शोध लागला.

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली असून त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागपूरमध्येही असाच एक भयानक प्रकार घडला होता. भिक्षेकरी महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यामुळे शहर हादरलं. मात्र पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. त्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची , AI ची मदत घेत त्याच्या सहाय्याने या हत्या प्रकरणाचा उलगडा केला. विशेष म्हणजे, त्या मृतदेहाच्या शेजारी पडलेल्या चिप्स पॅकेटवरून नागपूर पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध घेतला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी एआयच्या मदतीने गुन्ह्याची उकल केली. तब्बल 10 दिवसांनी या प्रकरणाचा छडा लागला आहे. मात्र नराधम आरोपीला अटक झाली असली तरी ही त्या हत्या झालेल्या भिक्षेकरी महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या आरोपीवर आधीही एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर मंडपे असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. सावनेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत बेड्या ठोकल्या. आरोपी हा विवाहित असून, 21 वर्षांपूर्वी त्याच्या विरुद्ध एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता.
चिप्स पॅकेटच्या तुकड्यावरून आरोपीचा शोध
या गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी एक चिप्सच्या पॅकेटचा छोटा तुकडा आढळून आला. पोलिसांनी त्या भागात चिप्सच्या वितरकांना बोलावून घेतलं आणि या भागात गेल्या काही दिवसात कोणी चिप्स विकत घेतले का, ऑनलाइन पेमेंट केलं का, याचासुद्धा शोध सुरू केला. त्यादरम्यान नागपूर ग्रामीण पोलिसांना एक बाब स्पष्ट झाली की या प्रकरणाचा तपास पाटणसावंगी ते खापरखेडाच्या दिशेने करावा लागेल.
52 हजार फोन नंबर्सची केली तपासणी
सावनेर पोलिसांनी ज्यावेळी प्रकरणाचा तपास सुरू केला होता, त्यावेळी हे प्रकरण अतिशय साधा-सोपं दिसून येत होतं. मात्र, पोस्टमार्टेमच्या अहवालानंतर या गुन्हाच्या तपासाची दिशाच बदलली. एकीकडे पोलिसांनी शेकडो सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. एवढंच नव्हे तर त्याचसोबत त्यांनी 52 हजार फोन नंबर्सची देखील तपासणी केली.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे लावला गुन्ह्याचा छडा
या गुन्हयाचे गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, सावनेर पोलीस स्टेशन, केळवद पोलीस स्टेशन आणि सायबर पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी अथक परिश्रम घेऊन या गुन्ह्याची उकल करत आरोपीला शोधून काढलं
संपूर्ण तपासादरम्यान (मारवल) MARVEL (Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement) या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेली महत्त्वाची कार्यवाही करण्यात आली. मृतक महिलेचा चेहरा सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे तिची ओळख पटविण्यासाठी Marvel Al Photo Enhancement तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तिच्या चेहऱ्याची पुनर्रचना (Face Reconstruction) करण्यात आली. त्यानंतर अथक प्रयत्न करून आरोपीचा शोध घेऊन त्याला अखेर अटक करण्यात आली.