
नागपूरमध्ये काल झालेल्या हिसांचाराने राज्यात वातावरण तापलं आहे. औरंगजेबाच्या कबरीचा वाद चांगला पेटला, नागपूरमध्ये तर या मुद्द्यावरून दोन गटात मोठा राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली, त्यानंतर वाहनांची तोडफोड करत अनेक वाहने पेटवून दिली. त्यामुळे नागपूरच्या महल भागात तणावाचं वातावरण होतं. हाच मुद्दा आज विधानसभेतही चांगलाच गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर निवेदन दिलं, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मुद्यावर प्रतिक्रिया दिली.
राज्यात सर्व ठिकाणी औरंगजेबाविरोधात आंदोलन सुरु आहे. तो महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. नागपूरमध्ये काल आंदोलन झालं. पोलिसांनी वातावरण शांत केले पण मग संध्याकाळी लोक जमतात कसे ? अनेक घरात मोठमोठे दगड टाकले. हॉस्पिटलची तोडफोड केली, एक पाच वर्षांचा बच्चू वाचला. तिथे ह़ॉस्पिटलमध्ये आंदोलकांनी देवाचे फोटो जाळले. तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा ना पण मारमारी , पण कायदा का हातात घेता, दगडफेक का करता ? तिथल्या आंदोलकांकडे पेट्रोल बॉम्ब होते, गाड्या जाळल्या जातात ते पेट्रोल बॉम्ब कुठून येतात ? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित करत संशय व्यक्त केला.
तिथे शहरात एका विशिष्ट ठिकाणी 100ते 150 गाड्या दररोज पार्क व्हायच्या, पण काल एकही गाडी नव्हती. याचा अर्थ काय, म्हणजेच जाणीवपूर्वक व नियोजनपूर्वक ही साजिश होती, एका विशिष्ट समाजाला टार्गेट केले गेले असा आरोपही शिंदे यांनी केला. पोलिसांवर हल्ला केला गेला, कुऱ्हाडीने वार केले, तलवारीही होत्या.33 पोलीस जखमी झाले, याचा अर्थ काय असा सवाल उपमुख्यमंत्र्यांनी विचारला. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकार प्रमाणे आपल्या सर्वांची आहे, असे शिंदे म्हणाले.
त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही
छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तनासाठी 40 दिवस औरंग्याने अगणित अत्याचार केले. मात्र तरिही त्याच्यापुढे संभाजी महाराज झुकले नाहीत. देशासाठी धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान केले. त्यामुळे औरंग्याचा कलंक महाराष्ट्रातून पुसला जावा, अशी लोकांची भावना आहे, असे शिंदे म्हणाले. या देशावर ब्रिटिशांनी आक्रमण केले आणि राज्य केले. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटीश सत्तेचा कलंक पुसण्यात आला. तशाच प्रकारे क्रूर अत्याचारी औरंग्याचा कंलक महाराष्ट्रातून पुसला पाहिजे. औरंग्याचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोह असून त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. अबू आझमींवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आले, असे ते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सडकून टीका
जे जे लोक औरंग्याच्या समर्थनासाठी पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. औरंग्याच्या क्रूर शासनाची तुलना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सडकून टीका केली. राज्य सरकारने सपकाळ यांच्यावर अत्याचार केलेत का ? अमानूष छळ केला का? असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला