किन्ही मोखे गावावर शोककळा, 17 शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जळाले, 33 एकरातल्या धानाची झाली राखरांगोळी

| Updated on: Nov 22, 2021 | 11:46 AM

शनिवारी रात्री अज्ञान व्यक्तींनी ही आग लावली. गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. मंडल अधिकारी हलमारे यांनी पंचनामे केले. आग लावणारा एकटा व्यक्ती नसावा, असा अंदाज आहे. पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले होते. पुंजण्याला आग सहसा लावली जात नाही.

किन्ही मोखे गावावर शोककळा, 17 शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जळाले, 33 एकरातल्या धानाची झाली राखरांगोळी
Follow us on

भंडारा : जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्या धान घरी आणून आनंदोत्सव साजरे करण्याचे दिवस आहेत. पण, शनिवारी रात्री किन्ही मोखे गावातल्या 17 शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आले. त्यामुळं गावात शोककळा पसरली आहे.

शनिवारी रात्री अज्ञान व्यक्तींनी ही आग लावली. गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. मंडल अधिकारी हलमारे यांनी पंचनामे केले. आग लावणारा एकटा व्यक्ती नसावा, असा अंदाज आहे. पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले होते. पुंजण्याला आग सहसा लावली जात नाही. गावातील राजकारण किंवा एखादी दुष्मणी याला कारणीभूत असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. धान कापल्यानंतर त्याचे पुंजणे रचून शेतातच ठेवले जातात. धान चुरल्यानंतर धान घरी आणले जाते किंवा सरळ धान खरेदी केंद्रांवर नेले जाते.

गावात पोलीस बंदोबस्त

दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घटनेनंतर तणाव निर्माण होऊ नये, म्हणून गावात पोलीस बंदोबस्त वाढण्यात आलाय. धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर चुरणे करू, असे शेतकऱ्यांना वाटत होते. कारण धान चुरून पुन्हा घरी आणल्यानंतर धान खरेदी केंद्रावर न्यावे लागतात. त्यात वेळ आणि श्रम दोन्ही वाया जातात.

शासनाकडून मदतीची मागणी

अज्ञान व्यक्तीने हे धानाचे पुंजणे जाळले. यात 17 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळं सरकारनं नुकसानभरपाई म्हणून एकरी 25 हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत.

निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

गेल्या वर्षीही धानाच्या पुंजण्याला आग लावण्यात आली होती. त्या घटनेतील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. यंदाही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या आरोपींना अटक करून शिक्षा होणार की, नाही काही सांगता येत नाही. त्यामुळं आरोपींचा शोध लागला नाही, तर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. धान घरी येणार म्हणून शेतकरी खुश होते. परंतु, त्यांच्या आनंदावर या घटनेमुळं विरजण पडले आहे. आता धानावर मिळालेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. निदान कर्ज माफ करावा, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे.

भाजप नेते छोटू भोयर यांनी का सोडला पक्ष?, पक्षात मोठी खदखद असल्याचा आरोप

नागपुरात युवा सेनेच्या नेत्यावर फसवणुकीचा गुन्हा, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत केला होता सेनेत प्रवेश