‘अब्दुल सत्तार यांनी 150 कोटींची जमीन मातीमोल किंमतीत विकली’, अजित पवार यांच्याकडून कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

| Updated on: Dec 26, 2022 | 4:38 PM

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अब्दुल सत्तार यांनी 150 कोटींची जमीन मातीमोल किंमतीत विकली, अजित पवार यांच्याकडून कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वाशिममधील तब्बल 150 कोटी रुपयांची जमीन अगदी मातीमोल दरात एका व्यक्तीला विकल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केला. यावेळी विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विशेष म्हणजे सभागृहात मागणी केल्यानंतर विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचा आजचा पहिला दिवसही चांगलाच गाजला.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील सभागृहामध्ये गोंधळ झालेला बघायला मिळाला. गेल्या आठवड्यात विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या आठवड्यात विरोधकांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अब्दुल सत्तार यांनी वाशिममधील गायरान जमीन लाटल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी विधानसभेत आज केला.

अब्दुल सत्तार यांनी तब्बल 37 एकर जमीन लाटल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय. विशेष म्हणजे या जमिनीची किंमत 150 कोटी इतकी होती. पण ती जमीन अब्दुल सत्तार यांनी मातीमोल किंमतीत एका व्यक्तीला विकली, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी केलाय.

“सरकारची संपत्ती कुणाला देण्याचा अधिकार नाही. त्यांची अशी अनेक वेगवेगळी प्रकरणं समोर आलेली आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा”, अशी मागणी अजित पवार यांनी केलीय.

“कृषी विभागाला वेठीस धरलं आहे. मी अधिकाऱ्यांचं नाव घेत नाही. अधिकाऱ्यांनी म्हटलंय की दादा आम्हाला कोट करु नका. पण न विचारता आमचे तिथे फोटो टाकले आहेत”, असं अजित पवार विधानसभेत म्हणाले.

‘अब्दुल सत्तार यांचं प्रकरण गेल्या सरकारमधील’, मुनगंटीवार यांचा दावा

अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर भाजप नेते सुधील मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. अब्दुल सत्तार यांचं प्रकरण गेल्या सरकारमधील असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच गेल्या सरकारच्या काळात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे धृतराष्ट्रच्या भूमिकेत होते का? असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आरोपांवर विधानसभेत प्रतिक्रिया दिलीय. आपण जो मुद्दा मांडलात त्याची जरुर माहिती घेतली जाईल. ती माहिती घेऊन वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडू. सिल्लोड महोत्सवासंदर्भात जे मुद्दे मांडले आहेत त्याची गंभीर दखल शासन घेईल. त्यासंदर्भात कुठेही असं चाललं असेल तर या विरोधात सरकार कारवाई करेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.