जे पेरलं ते उगवलं, चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा

| Updated on: Jul 03, 2023 | 4:56 PM

माध्यमातून राज्य, देशासाठी काय चांगले होईल हे महत्त्वाचे आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव राज्याच्या विकासासाठी कामात येईल.

जे पेरलं ते उगवलं, चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
Follow us on

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी साताऱ्यातील कराड येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांनी फोडली त्यांना जागा दाखवणार असल्याचा इशारा शरद पवार यांनी दिला. त्यांचा रोख हा भाजपकडे होता. यावर बोलताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जसं पेरालं तसं उगवते, असं म्हणत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात ९ वर्षांपासून भाजपची सरकार आहे. भाजपच्या वतीनं देशभर संपर्क अभियान सुरू आहे. अजित पवार हे आमदार आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळाला समर्थन दिलं. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात जे काही निर्माण झालं आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देश पुढं न्यायचं असेल तर महाराष्ट्र पुढं गेला पाहिजे. अजित पवार यांच्यासोबत आलेले सहकारी मोदी यांच्या नेतृत्वात आम्हाला साथ देतील, असा विश्वास व्यक्त केला.

एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील

मंत्रीमंत्रळाच्या खातेवाटपाचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात. त्यामुळे कोणाला कोणते खाते द्यायचे हे मुख्यमंत्री शिंदे ठरवतील. खातेवाटपाबद्दल मुख्यमंत्री ठरवतील. हा अधिकारी शेवटी मुख्यमंत्र्यांचा आहे. मंत्रीमंडळातील कोणते खाते कुणाला द्यायचे हे एकनाथ शिंदे हे योग्य निर्णय करतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

अनुभव राज्याच्या विकासात कामात येणार

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांना जे बोलायचे ते बोलले. शेवटी राजकारणात बेरजेला महत्त्व आहे. सरकारमध्ये जे पक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्य, देशासाठी काय चांगले होईल हे महत्त्वाचे आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव राज्याच्या विकासासाठी कामात येईल.

मोदी यांच्या नेतृत्वात अनेक विचारांचे पक्ष एकत्र येत आहेत. मोदी यांचे नेतृत्व जगाने स्वीकारला आहे. देश, राज्यातील अनेक लोकं राष्ट्रनिर्माण आणि गरीब कल्याणसाठी भाजपला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

मोदींना अनेकांचा पाठिंबा

चर्चा काहीही असेल पण, मोदी यांच्या नेतृत्वाला समर्थन मिळालंय. जगात भारताला सर्वोत्तम करण्याचं मोदी यांचे स्वप्न आहे. त्यांच्या या ध्येयाला अनेक लोकांचा पाठिंबा आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात सर्व आमदार राज्य हे नंबर एक झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करतील. राजकारणात विकास दडलेला असतो.

कधीकधी जीवनात काम्प्रमाईज करावा लागतो. एखाद्याला मंत्रीपदासाठी आमचे कार्यकर्ते काम करत नाहीत. देश, राष्ट्र हितासाठी समर्पन देतात. त्यामुळे यामध्ये गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांनी जे पेरलं ते उगवलं

शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं म्हटलं. शरद पवार हे रस्त्यावर उतरतील. ते यापूर्वीही रस्त्यावर उतरले होते. काय झाले ते माहीत आहे. २०१९ मध्ये शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खंजीर खुपसला होता. शरद पवार यांनी वेगवेगळ्या युक्त्या केल्या. फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ नये, यासाठी सर्व केलं होतं. आता शरद पवार यांनी जे पेरलं ते उगवलं, अशी खोचक टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर केली.