नागपूर जिल्ह्यात दोन गावात लम्पी सदृष्य आजार, 5 किलोमीटर परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

| Updated on: Sep 13, 2022 | 10:52 PM

दोन्ही गावांच्या आजूबाजूला पाच किलोमीटरच्या हद्दीमध्ये जवळपास वीस गावांचा समावेश होतो. त्यामध्ये सुमारे 5 हजार 126 एवढ्या गोवंशीय पशुधनाची संख्या आहे. या गावातील पशुपालकांना सतर्क करण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यात दोन गावात लम्पी सदृष्य आजार, 5 किलोमीटर परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
Follow us on

नागपूर : महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये लम्पी आजारानं दहशत निर्माण केली. गुरांवरील लम्पी सदृश्य आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दोन गावांमध्ये दिसली. त्यामुळं जिल्ह्याचा पशुसंवर्धन (Animal Husbandry) विभाग सतर्क झालाय. पाच किलोमीटर परिसरात पशुपालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आजारावर उपाय आहे. नागरिकांनी जनावरावर लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी. घाबरून जाऊ नये, योग्य उपचार करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने (Administration) केले आहे.

नऊ पशु रुग्णांची नोंद

आज सावनेर तालुक्यातील बडेगाव आणि उमरी जांभळापाणी या दोन गावांमध्ये लम्पी रोगसदृश्य लक्षणे दर्शवणारे अनुक्रमे तीन आणि सहा अशा एकूण नऊ पशु रुग्णांची नोंद झालेली आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक , डॉक्टर युवराज केने, सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नागपूर यांनी तात्काळ बाधीत गावांना भेट दिली. पशु रुग्णांची तपासणी केली.नमुने गोळा करण्याची प्रक्रिया राबवलेली आहे.

रोगाचे नमुने पुण्याला पाठविले जाणार

गावातील पशुपालकांना रोगाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. करावयाच्या प्रतिबंधक उपाय योजनेची माहिती देण्यात आली. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला तात्काळ गावातील सर्व गोठे, साचलेली डबकी, निरोगी जनावरे यांची फवारणी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. गोळा करण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी आणि रोगाच्या निदानासाठी रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठवले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

72 तासांत लसीकरण होणार

दोन्ही गावांच्या आजूबाजूला पाच किलोमीटरच्या हद्दीमध्ये जवळपास वीस गावांचा समावेश होतो. त्यामध्ये सुमारे 5 हजार 126 एवढ्या गोवंशीय पशुधनाची संख्या आहे. या गावातील पशुपालकांना सतर्क करण्यात आले आहे.सर्व जनावरांना गोट पॉक्स उत्तर काशी स्ट्रेन ही लस लावण्यात येणार आहे. सदर लसीकरणाचे काम येत्या 72 तासात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तुकड्यांचे नियोजन केलेले आहे.

अशी असतात लक्षणं

लम्पी त्वचारोग हा गो -म्हैष वर्गीय पशुधनामधील विषाणूजन्य आजार आहे. त्याचा प्रादुर्भाव सर्व वयाच्या पशुंना होतो. या आजाराचा प्रसार बाह्य कीटकाद्वारे जसे मच्छर गोचीड, माशा तसेच आजारी पशुंच्या त्वचेवरील व्रणातून वाहणारा स्त्राव, नाकातील स्त्राव, दूध, लाळ,वीर्य व इतर स्त्रावांमुळे होतो. या आजारात पशूंना ताप येणे, पूर्ण शरीरावर दहा ते पंधरा मिलीमीटर व्यासाच्या कडक गाठी येणे, तोंड नाक डोळ्यात व्रण निर्माण होणे,चारा खाण्यास त्रास होणे, अशक्तपणा, भूक कमी होणे, वजन कमी होणे, दूध उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. काही वेळा खूपच दाह आणि स्तनदाह सुद्धा दिसून येतो. पायावर सूज येऊन जनावरे लंगडतात.