खरा नवरा दाखल होताच ‘लुटेरी दुल्हन’चा गेम ओव्हर, भर मंडपातच हातात पडल्या बेड्या, नागपूरमध्ये घडलं काय?
Nagpur Looteri Dulhan Arrested: नागपूरमध्ये भर मंडपात चित्रपटासारखा हायहोल्टेज ड्रामा घडला. खरा नवरा दाखल झाला आणि लुटेरी दुल्हनचे मनसुबे धुळीस मिळाले. एका तरुणाची मोठी फसवणूक टळली नसली तरी अनेकांना गंडा घालणारी लुटेरी दुल्हन पोलिसांच्या हाती लागली. तिच्या अटकेमुळे अजून काही प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे. काय घडलं नागपूरमध्ये?

सुनील ढगे
नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन’ला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातमधील एका तरुणाला नागपुरात बोलावून त्याच्याकडून ७० हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मुख्य सूत्रधार राणी उर्फ कोमल पांडे हिला अटक करण्यात आली असून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. फिर्यादी आकाश जिंदल पारेख हा विवाहासाठी वधूच्या शोधात असताना त्याचा राणी पांडे हिच्याशी संपर्क झाला. तिने स्वतःला नम्रता मालवीयची बहीण सांगून तिचे फोटो दाखवले.
तरुणाची केली फसवणूक
त्यानंतर आकाशला कोराडी येथील एका घरात नेऊन नम्रताशी भेट घडवण्यात आली. लग्नखर्चाच्या नावाखाली ७० हजार रुपये आणि दागिने घेतले. सीताबर्डीतील मंदिरात लग्नाची तयारी सुरू असताना एका व्यक्तीने नम्रता ही स्वतःची पत्नी असल्याचा दावा करत गोंधळ घातला. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आकाशने पोलिसांत तक्रार दिली.
राणी पांडेचा यापूर्वीही अशाच फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे समोर आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली.
लग्न मंडपातच हायव्होल्टेज ड्रामा
ठरल्यानुसार सीताबर्डी येथील एका मंदिरात लग्नाची तयारी करण्यात आली होती. नवरदेव आणि नवरी मंडपात पोहचले. आकाश पारेख हा आनंदित होता. त्याला फसवणूक होत असल्याची साधी कल्पनाही आली नव्हती. लग्नविधी सुरू असतानाच अचानक एक अनोळखी व्यक्ती मंडपात दाखल झाली. त्याने नम्रता ही स्वतःची पत्नी आहे असा गोंधळ घातला. आकाशने या व्यक्तीला सर्व माहिती विचारली. तेव्हा आकाशच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाच्या मंडपातच आपली मोठी फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानं तातडीने सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार कथन केला. त्याने तक्रार नोंदवली.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मुख्य सूत्रधार राणी पांडे हिला ताब्यात घेतले. आता याप्रकरणातील मध्यस्थी आणि राणीच्या साथीदारांची धरपकड करण्यात येणार आहे. राणी पांडे हिला अटक करण्यात आल्यानंतर प्राथमिक तपासात तिने इतर अनेकांची अशीच फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ती फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. ती एक संघटित टोळी तर चालवत नाही ना? या अँगलने तपास सुरू आहे.