माणूस आपल्याच चुकांनी… सुधीर मुनगंटीवार यांचं चार ओळीत सूचक विधान

500 कोटींच्या क्लिपवरून भाजप-शिंदे गटातील वाद वाढला असताना, सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली. "कोणी कुणाला संपवू शकत नाही," असे सांगत त्यांनी कल्पोकल्पित क्लिप्समुळे महायुतीत वितुष्ट येऊ नये असे आवाहन केले. मनोज जरांगे पैसे घेणार नाहीत, अशी खात्री व्यक्त करत त्यांनी दुष्काळासारख्या गंभीर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

माणूस आपल्याच चुकांनी... सुधीर मुनगंटीवार यांचं चार ओळीत सूचक विधान
sudhir mungantiwar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 11:21 AM

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : एका क्लिपमधील 500 कोटींच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार जुंपली आहे. भाजपने तर या मुद्द्यावरून शिंदे गटाची पिसेच काढली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची सुपारी कोणी घेतली होती? त्यासाठी जरांगेंना मदत कुणी केली होती? असा सवाल भाजपच्या नेत्यांनी शिंदे गटाला केला आहे. त्यावर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कुणाला संपवू शकत नाही. संपवायचं असेल तर स्वत:च्या चुकांनी माणूस अडचणीत येतो. जनतेचा आशीर्वाद हा पदाशी संबंधित नसतो. तो कामाशी संबंधित असतो, असं सूचक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मीडियाशी संवाद साधताना ते बोलत होते.

भाजपला एकनाथ शिंदे यांची भीती आहे, असा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला होता. त्यावरही सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कशाला भीती वाटेल? शिंदे आमचे मित्र आहेत. मित्रच राहतील. भीती वाटण्याचं कारण काय? आमची मैत्री आहे. मित्रांमध्ये भीती वाटायला लागली तर ते राजकारण राहणार नाही, असं सांगतानाच महायुतीत अशी विधाने होऊ नये. कल्पोकल्पित गोष्टीकडे लक्ष देऊ नका. हा राजकारणाच्या डावपेचाचा भाग असू शकतो. भाजप आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

Loading...

मग प्रत्येकालाच अटक करायची का?

पैसे कोणी देणार नाही आणि घेणार नाही? एका कथेसारखी या क्लिपची गोष्ट आहे. कोंबडीचं पिल्लू आकाश पडलं म्हणून धावत सुटलं होतं. नंतर कळलं झाडाचं पान पडलं होतं, अशीही अवस्था आहे. नवीन नवीन शास्त्रज्ञ दुर्बीणाला डोळा लावतो. त्यानंतर आकाशाकडे पाहून मोठं वादळ येणार… मोठं वादळ येणार… म्हणून किंचाळत सुटतो. पण नंतर कळतं भिंगावर माशी आहे. या शास्त्रज्ञांसारखी या लोकांची अवस्था आहे. त्यामुळे कल्पोकल्पित गोष्टीवर भाष्य केलं तर राजकारणात असे पायंडे पडतील. उद्या कोणीही दोन माणसं अशी क्लिप तयार करतील आणि कुणाचीही बदनामी करतील. मग प्रत्येकालाच अटक करत सुटायचं का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

तर जरांगे राजकारणात आले असते

500 कोटी कोणी कुणाला देईल का? ही कॉमनसेन्सची गोष्ट आहे. मनोज जरांगे सच्चे कार्यकर्ता आहेत. ते कशाला पैसे घेतील? असं असतं तर ते राजकारणात आले असते. एखादं पद घेतलं असतं. शिंदे साहेब देणार नाही आणि जरांगे घेणार नाही, याची मला खात्री आहे, असंही त्यांनी म्हटलं.

क्लिपपेक्षा दुष्काळ महत्त्वाचा

क्लिपवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राजकारणात परिपक्वता वाढणं आवश्यक आहे. अशा ऑडिओ क्लिपला गंभीरपणे घेण्याची गरज नाही. कल्पोकल्पित व्हिडीओ क्लिप येतात आणि काळानुरूप गडप होतात. या आधीही आपण पाहिलं आहे. क्लिपमध्ये कुणाबद्दल कोण काय बोलणार हे तुमच्या हातात नसतं. ती कधी कधी एआय आधारीत असू शकते. सामान्य लोकांना क्लिपपेक्षा दुष्काळाबाबत चॅनल्सवर चर्चा व्हावी असं वाटतं. जो शेतकरी कष्टाने अन्न पिकवतो, तुमच्या माझ्या ताटापर्यंत अन्न पोहोचवतो त्याची चर्चा चॅनलवरून गायब आहे. अशा दंतकथेवर आधारीत क्लिपच्या चर्चा चालवल्या जातात हे योग्य नाही. राजकारणातील चक्रव्यूहाचा हा भाग झाला आहे. अशा प्रकारच्या आर्टिफिशियल ऑडिओ क्लिप करायच्या आणि त्यावर चर्चा घडवून आणायच्या आणि राजकारणाचा स्तर कमी होईल हे पाहायचं हे योग्य नाही, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us