एकीकडे ठाकरे आणि काँग्रेसला धक्का, पण आता भाजपचा स्वतःचाच बालेकिल्ला धोक्यात, नेमकं काय घडलं?

नाशिक भाजपमध्ये जुन्या आणि नव्या नेत्यांमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी माजी महापौर विनायक पांडे आणि शाहू खैरे यांच्या प्रवेशावर उघड नाराजी व्यक्त करत फेसबुक पोस्टद्वारे पक्षाला इशारा दिला आहे.

एकीकडे ठाकरे आणि काँग्रेसला धक्का, पण आता भाजपचा स्वतःचाच बालेकिल्ला धोक्यात, नेमकं काय घडलं?
bjp
| Updated on: Dec 25, 2025 | 12:24 PM

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकीय मैदानात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. असे असतानाच भाजपच्या विद्यमान आमदार आणि नाशिक निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील या अंतर्गत वादामुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असलेल्या आणि शहरात पक्षाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या देवयानी फरांदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. नाशिकमध्ये आज माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला. यावर देवयानी फरांदे यांनी संताप व्यक्त केला आहे. मी नाशिक शहराच्या निवडणूक प्रमुख असूनही इतक्या मोठ्या निर्णयाबाबत मला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले, असा आरोप देवयानी फरांदे यांनी केला आहे. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढा देणाऱ्या खऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे, असेही देवयानी फरांदे यांनी म्हटले.

विरोधी पक्षांची मोठी पडझड

त्यांच्या या विधानाचा रोख थेट आयात केल्या जाणाऱ्या नेत्यांकडे असल्याचे बोलले जात आहे. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून येणाऱ्यांना झुकते माप दिले जात असल्याची भावना देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली आहे. संकटमोचक गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यामुळे विरोधी पक्षांची मोठी पडझड झाली आहे.

गेल्या ४३ वर्षांपासून शिवसैनिक असलेल्या विनायक पांडे यांनी राजीनामा दिला आहे. मुलाच्या उमेदवारीवरून ते नाराज होते. संजय राऊत यांच्याशी चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने त्यांनी अखेर भगवा झेंडा सोडून हाती कमळ घेण्याचा निर्णय घेतला. तर काँग्रेसचे नेते शाहू खैरे हे आज भाजपत प्रवेश करत आहेत. काँग्रेसचा शहराचा मोठा चेहरा आता भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. मनसे आणि शिवसेनेतून आलेले माजी महापौर यतीन वाघ यांनीही भाजपची वाट धरली आहे.

मी विकासासाठी भाजपचा मार्ग निवडला

“शिवसेना सोडताना दुःख होत आहे, पण तिथे सन्मान राहिला नाही. मागच्या वेळी माझ्या मुलाचे तिकीट कापले गेले, तेव्हा झालेल्या हाणामारीचे जखम अजून ताजी आहे. आताही तसेच संकेत मिळत असल्याने मी विकासासाठी भाजपचा मार्ग निवडला आहे,” असे विनायक पांडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान एकीकडे काँग्रेस-शिवसेनेला खिंडार पाडल्याचा आनंद भाजप साजरा करत आहेत. मात्र देवयानी फरांदे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याच्या विरोधामुळे पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. देवयानी फरांदे यांच्या भूमिकेमुळे नाशिकच्या जागावाटपात आणि प्रचारात भाजपला अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.