कोरोनामुक्तीनंतर अनेकांना गंभीर आजार, डोळे गमावण्याची वेळ, नाक-दातांनाही त्रास

गेल्या एक महिन्यात एकाच रुग्णालयात म्युकरमाक्रोसिसचे तब्बल 30 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. (Corona Free Diabetes Patients Mucormycosis)

कोरोनामुक्तीनंतर अनेकांना गंभीर आजार, डोळे गमावण्याची वेळ, नाक-दातांनाही त्रास
कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकरमाक्रोसिसचा अधिक धोका

नाशिक : कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक जणांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागत आहे. मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींना विशेषतः म्युकरमाक्रोसिस (Mucormycosis) या आजाराने ग्रासल्याचे समोर आले आहे. अनेकांचे डोळेही काढावे लागल्याची गंभीर बाब नाशिकमधील डॉक्टरांनी सांगितली. (Nashik Corona Free Diabetes Patients suffering from Mucormycosis may lose eye sight)

नाशिकमध्ये कोरोनामुक्त व्यक्तींना नाक, दात आणि डोळ्यांना गंभीर इजा होत असल्याचं समोर आलं आहे. म्युकरमाक्रोसिस या आजाराने अनेकांचे डोळे देखील काढावे लागले आहेत. गेल्या एक महिन्यात एकाच रुग्णालयात म्युकरमाक्रोसिसचे तब्बल 30 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.

कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत आहे. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो. त्यामुळे लवकर उपचार घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.

रुग्णाचा अनुभव

“एप्रिल अखेरीस मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो. हॉस्पिटलला अॅडमिट झालो. दोन दिवसांनी ते म्हणाले रेमडेसिव्हीर इंजेक्शन द्यावं लागेल. मी ते उपलब्ध करुन दिले. तिसऱ्या इंजेक्शनच्या वेळेस असं लक्षात आलं की डाव्या बाजूला नाक आणि डोळ्याजवळ सेन्सेशन नव्हतं. आम्ही त्यावेळेस घाबरलो. ओळखीच्या फिजिशनकडे गेलो, त्यांनी नाक-घशा तज्ज्ञ डॉक्टरांकडे लवकर जाण्याचं सुचवलं. अन्यथा ते वाढत जाईल, असा धोका वर्तवला. दहा दिवसांपूर्वी मी नाशिकच्या डॉक्टरांकडे आलो. आता ऑपरेशन होणार आहे. कोरोनानंतर डायबिटीस वाढल्याने नाकात फंगल इन्फेक्शन झाल्याचं त्यांनी सांगितलं” असा अनुभव एका रुग्णाने सांगितला.

डॉक्टर काय सांगतात?

“म्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. याचं प्रमाण देशभरात पाहायला मिळत होतं. दोन लाटांमध्ये हा फरक दिसत आहे. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत चकित करणारे प्रमाण दिसत आहे. मागच्या महिन्यात या आजाराच्या तीस रुग्णांची आम्ही ऑपरेशन केली. उभ्या आयुष्यात इतके पेशंट पाहिले नाहीत. या सगळ्या रुग्णांमध्ये दोन गोष्टी कॉमन होत्या, कोव्हिडची लागण आणि मधुमेह. काही जणांना डायबिटीजविषयी माहिती होतं, तर कोणाला आता चाचणीनंतर तो डिटेक्ट झाला. किरकोळ शुगर वाढलेली नाही, तर 200-300-400 या लेव्हलवर वाढ होती. सर्व वयोगटातील रुग्णांना होत आहे, मी पाहिलेला तरुण 33 वर्षांचा, तर सर्वात वृद्ध 70 वर्षांचा होता.” अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

संबंधित बातम्या :

नाशकात चक्कर येऊन होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढताच, एकाच दिवशी 11 जण दगावले

चक्कर येऊन होणाऱ्या मृत्यूनंतर आता नाशकात छातीदुखीमुळे बळी, दोन दिवसांत पाच जण दगावले

(Nashik Corona Free Diabetes Patients suffering from Mucormycosis may lose eye sight)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI