नऊच्या नऊजण खोल विहिरीत दगावले… मयतांमध्ये 6 लहान मुले; मृतांची नावं आली समोर

नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात ६ लहान मुलांचा समावेश आहे. खाजगी क्लासेसमधून परत येताना हा अपघात घडला. रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहिरीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून, दोषींवर कारवाईचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर.

नऊच्या नऊजण खोल विहिरीत दगावले... मयतांमध्ये 6 लहान मुले; मृतांची नावं आली समोर
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 12:38 PM

शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास नाशिकच्या दिंडोरीमध्ये बरधाव वेगाने येणारी कार पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहीरीत कोसळल्याने अख्खं राज्य हादरलं आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला. खाजगी क्लासेसच्या स्नेहसंमेलनावरून घरी परत येत असताना हा दुर्दैवी अपघाता झाला. मृतांमध्ये पालकांसह, 6 लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान दिंडोरी येथे रस्त्याच्या मधोमध असलेल्या ज्या विहीरीत ही कार कोसळली, त्याच विहीरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर खाजगी क्लासेसचे चालक संचालक सचिन वडजे यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान 9 जणांचा बळी घेणाऱ्या या अपघात प्रकरणानंतर दिंडोरीचे आमदार आणि मंत्री नरहरी झिरवळ, तसेच गिरीश महाजन यांच्याकडून अपघात स्थळाची पाहणी करण्यात आली आहे. या अपघातात दरगोडे कुटुबातील 9 जण मृत्यूमुखी पडले असून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

दिंडोरी कार दुर्घटनेतील मृतांची संपूर्ण यादी

एकाच दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

मृतांची नावे व वय :

सुनील दत्तात्रय दरगोडे (32)

रेशमा सुनील दरगोडे (27)

आशा अनिल दरगोडे (32)

गुणवती सुनील दरगोडे (11)

श्रेयश अनिल दरगोडे (11)

श्रावणी अनिल दरगोडे (11)

सृष्टी अनिल दरगोडे (14)

समृद्धी राजेंद्र दरगोडे (7)

श्रद्धा अनिल दरगोडे (13)

सर्व मृत इंदोरे, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील रहिवासी असून संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईकांचा हृय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळलं.

दोषी  अधिकाऱ्यांवर देखील सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला जाईल – गिरीश महाजन

भाजप नेते गिरीश महाजन यांनीही घटनास्थळाची पाहणी केली, फोनवर डॉक्टर पोलिसांशी संपर्क साधला. लोकांशी चर्चा केली. तसेच मृतांच्या कुटुंबियांशीही त्यांनी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकराबद्दल दु:ख व्यक्त केलं. ” गंभीर घटना आहे, रस्त्याच्या मधोमध विहीर कशी असू शकते ?” असा सवाल त्यांनी विचारला. ” या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी देखील दाखल घेतली आहे, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. याप्रकरणी विहीर मालकावर गुन्हा दाखल केला आहे. विहिरीचे सगळे कागदपत्र तपासून दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत, असं सांगत जे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर देखील सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला जाईल” असं महाजन यांनी नमूद केलं.

तातडीने विहीर बुजवली जाईल – नरहरी झिरवाळ

दिंडोरीचे आमदार आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तेथील अधिकारी, डॉक्टर यांच्याशीही ते बोलले. जी घटना घडली ती अत्यंत वाईट आहे, 9 जणांचा मृत्यू झालाय. ही विहीर रस्त्याच्या मधोमध आहे, असं कसं होऊ शकतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, मी स्वतः चौकशीचे आदेश दिले आहेत असं सांगत ही विहीर तातडीने बुजवली जाईल असंही झिरवळ यांनी नमूद केलं.

Follow Us