महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

| Updated on: Feb 23, 2022 | 12:00 PM

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी बहुतांश पक्षातून स्थानिक नेत्यांच्या कुटुंबातच तिकीटे हवी आहेत. त्यात आमदार, महापौर आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची घरे आघाडीवर आहेत. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची राजकीय पक्षातील घराणेशाही निदान महापालिकेपुरती तरी कमी होणार का, सामान्य कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार काय, असा सवाल केला जातोय.

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!
Election
Follow us on

नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेची निवडणूक (Municipal Corporation) तोंडावर आलीय. महापालिकेतील सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधी पक्ष शिवसेनेने (Shiv Sena) त्यासाठी जोरदार तयारी सुरू केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवारांची चाचपणी करत त्यात आघाडी घेतलीय. मात्र, बहुतांश पक्षातून स्थानिक नेत्यांच्या कुटुंबातच तिकीटे हवी आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधी कार्यकर्ता मग नेता, अशी तंबी देऊनही भाजपमधून एका-एका घरात तीन-तीन तिकिटे मिळवण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची राजकीय पक्षातील घराणेशाही निदान महापालिकेपुरती तरी कमी होणार का, सामान्य कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार काय, असा सवाल केला जातोय.

आमदारांचे घर सर्वात पुढे

भाजपकडून आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी या महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे समजते. स्वतः सीमा हिरे या नाशिक पश्चिम मतदार संघातून आमदार आहेत. त्यांचे दीर योगेश हिरे हे नगरसेवक होते. आता त्यांच्या मुलींनाही यंदा तिकीट हवे आहे. आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे यांनाही महापालिकेचे तिकीट हवे आहे. अजिंक्य हे प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छुक असल्याचे समजते. प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांची मुलगी पूर्वा सावजी यांनाही महापालिका निवडणुकीचे वेध लागलेत.

महापौरांच्या घरात रांग

सध्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांचे चिरंजीव वैभव आणि मुलगा संध्या यांनाही महापालिकेत प्रवेश करायचा आहे. प्रदेश पदाधिकारी विजय साने यांचा मुलगा अजिंक्य यांनाही तिकीट हवे आहे. सध्या ते स्वीकृत नगरसेवक आहेत. स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या पत्नी दीपाली, माजी सभागृह नेता सतीश सोनवणे यांचा मुलगा अनिकेत, माजी आमदार सानप यांचा मुलगा मच्छिंद आणि सून यांनाही महापालिकेचे वेध लागतेत. सध्याच्या उपमहापौर भिकुबाई बागुल यांचा मुलगा संजय बागुल, नातून मनीष यांनाही महापालिकेत यायचे आहे.

शिवसेनाही नाही मागे

शिवसेनेत महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या घरात एक-दोन नव्हे, तर तिघांना महापालिकेचे तिकीट हवे आहे. त्यात बडगुजर यांच्या पत्नी हर्षा, मुलगा दीपक आणि स्वतः बडगुजर हे इच्छुक आहेत. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांचा पुतण्या आदित्यही महापालिकेत येण्यासाठी इच्छुक आहे. ज्येष्ठ पदाधिकारी विनायक पांडे यांचा मुलगा ऋतुराज, पुतणी शिवानी यांनाही तिकीट हवे आहे. सोबतच ज्येष्ठ नगरसेविका कल्पना चुंभळे, त्यांचा मुलगा प्रताप, दीर कैलास या तिघांनाही महापालिकेचे तिकीट हवे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधूनही एकाच घरातून अनेकजण इच्छुक आहेत. आता यांच्या भाऊगर्दीत किती सामान्य कार्यकर्त्यांची डाळ शिजणार, अशी चर्चा सुरूय.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात