10 लाख द्या, तब्बल 3000000 घ्या, बनावट नोटांच्या कारखान्यामुळे खळबळ, भामट्यांचा प्लॅन वाचून चक्रावून जाल!

Nashik Fake Notes Racket : नाशिकमधून एक हादरवून टाकणारे कांड समोर आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

10 लाख द्या, तब्बल 3000000 घ्या, बनावट नोटांच्या कारखान्यामुळे खळबळ, भामट्यांचा प्लॅन वाचून चक्रावून जाल!
Nashik fake Notes
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 9:26 PM

नाशिकमध्ये 2027 साली कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. विकास कामांना वेग आला आहे. या कुंभमेळ्याला संपूर्ण देशातून साधू, संत-महंत हजेरी लावणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष नाशिककडे असणार आहे. अशातच आता नाशिकमधून एक हादरवून टाकणारे कांड समोर आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाने संयुक्तिक कारवाई करत पर्दाफाश केले आहे. तळेगाव येथील एका बंगल्यामध्ये असलेला बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह छपाईचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने तब्बल पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

10 लाखांच्या बदल्यात 30 लाख

समोर आलेल्या माहितीनुसार या कारखान्यात अत्यंत वेगळ्या क्लृप्तीचा वापर करून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. खऱ्या चलनी नोटा केमिकलमध्ये बुडवून त्याची शाई दुसऱ्या कागदावर वटवून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. आरोपी 10 लाखांच्या खऱ्या चलनी नोटांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा देत होते. असाच एक व्यवहार सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली, त्यामुळे एकच खळबळ उडाली.

नोटा छापण्याचे साहित्य जप्त

पोलिसांना टाकलेल्या या धाडीत घटनास्थळाहून नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे केमिकल, प्रिंटिंग साहित्य आणि छापलेल्या लाखो रुपयांच्या बनावट नोटा असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे नाशिकसह तेलंगणापर्यंत पसरलेल्या मोठ्या रॅकेटचे धागेदोरे समोर आले आहेत. नाशिकमध्ये पुढील वर्षी कुंभमेळा होणार असून त्यासाठी देशभरातली लाखो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. या कुंभमेळ्यात बनावट नोटा चलनात आणण्याचा आरोपींचा डाव होता का? असा प्रश्नही या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पोलिसांकडून तपासाला सुरुवात

नाशिक पोलिसांनी या प्रकणाच्या तपासाला सुरूवात केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांची कसून चौकशी सुरू असून आता आगामी काळात आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us