
राज्यात महापालिका निवडणुकांची लगबग सुरु आहे. त्यातच आता आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी, नाशिकमध्ये जागावाटपावरून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने थेट महाविकास आघाडीसोबत (MVA) निवडणूक लढवण्याचा खळबळजनक प्रस्ताव दिला आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत ही नवी राजकीय चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आता पुणे-बारामती पॅटर्नची पुनरावृत्ती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकमध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला अपेक्षित स्थान आणि जागा मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी आता आपले पर्याय खुले केले आहेत. पुणे आणि बारामतीमध्ये ज्याप्रकारे अजित पवारांनी महाविकासआघाडीसोबत लढण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही महाविकास आघाडीसोबत एकत्रित निवडणूक लढवावी, असा निरोप अजित पवार गटाने आघाडीच्या स्थानिक नेत्यांना दिला आहे.
या धक्कादायक प्रस्तावानंतर ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. असा प्रस्ताव स्थानिक नेत्यांकडून आला आहे हे खरे आहे, मात्र यावर कोणताही निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर घेणार नाही. यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेच अंतिम निर्णय घेतील, असे वसंत गीते यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसनेही नाशिकमध्ये मोठी खेळी खेळली आहे. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने चक्क राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. जागावाटपाचा एक मसुदा तयार करण्यात आला आहे. काँग्रेसचे पदाधिकारी आज मुंबईत हायकमांडची भेट घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. यामध्ये मनसे आणि डाव्या पक्षांना सामावून घेण्यावर भर दिला जात आहे.
तर दुसरीकडे पुण्यात महायुतीच्या जागावाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठे नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. भाजपसोबतच्या युती चर्चेत निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले. पुण्यात भाजप शिवसेनेला केवळ १० ते १५ जागा देण्यास तयार असल्याची चर्चा आहे. यामुळे शिवसेनेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नीलम गोऱ्हे या कार्यकर्त्यांची बाजू योग्य रीतीने मांडत नसल्याने आणि निष्ठावंतांना डावलले जात असल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप-शिवसेना युतीचा अंतिम निर्णय होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.