महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप-शिंदे गटाचा मोठा प्लॅन लीक, जागावाटपाचा तिढा सुटला
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना महायुती सज्ज झाली आहे. उद्यापर्यंत जागावाटपाची घोषणा होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे

राज्यात सद्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीपूर्वी सध्या सर्वत्र राजकीय खलबत सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भाजप आणि महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या चारही महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
भाजप-सेना महायुतीवर शिक्कामोर्तब
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना युतीबद्दल विचारणा करण्यात आली. आजच्या बैठकीत चारही महानगरपालिकांसाठी महायुतीचा निर्णय झाला आहे. जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली असून, उद्या संध्याकाळपर्यंत अधिकृत यादी जाहीर केली जाईल. नागपूरमध्ये भाजप-सेना महायुतीवर शिक्कामोर्तब झाले असून, राष्ट्रवादीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, अकोल्यात राष्ट्रवादी आणि अमरावतीत रवी राणा यांचा स्वाभिमानी पक्ष महायुतीसोबत येण्याचे संकेत आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या रणनीतीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, ही निवडणूक ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढली जाईल. हंसराज अहिर, चैनसुख संचेती, अशोक नेते आणि किशोर जोरगेवार यांच्यावर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. सुधीर मुनगंटीवार आमचे खंबीर नेते आहेत. त्यांच्या मागे नितीन गडकरी, मुख्यमंत्री आणि संपूर्ण पक्ष उभा आहे. त्यांना डावलण्याचा प्रश्नच येत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीत मते मांडण्याचा सर्वांना अधिकार
चंद्रपूरच्या बैठकीत शाब्दिक चकमक झाल्याच्या चर्चांवर बावनकुळे यांनी मिश्किल टिप्पणी केली. काहीही वादावादी झाली नाही, फक्त खमंग चर्चा झाली. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. तीन तास चाललेल्या या बैठकीत सर्वांनी आपली बाजू मांडली आणि शेवटी एकमताने निर्णय घेण्यात आला,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीत काही नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली होती. मात्र बावनकुळे यांनी लोकशाहीत मते मांडण्याचा सर्वांना अधिकार असतो असे म्हणत वादावर पडदा टाकला.
नगरपालिका निवडणुकीत बसलेल्या फटक्यातून धडा घेत, आता महानगरपालिकेत भाजपचाच महापौर बसवण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. २७ तारखेपर्यंत सर्व उमेदवारांची अंतिम यादी समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
