विधान परिषदेसाठी घोडेबाजाराच्या चर्चा असताना नाशिकचे उमेदवार गोकुळ गीते यांचा ऑफरबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट

"माझ्या माघारीवरुन जळगाव निवडणुकीवर परिणाम होणार नाही. जळगावचं चित्र एकतर्फी, भाजपकडे बहुमत आहे" असा दावा गोकुळ गीते यांनी केला. "इथले आमदार निष्क्रिय आहेत. जनभावना आहे, मी लढावं. मला फडणवीसांना भेटायचं होतं. पण मी शिंदेंना भेटणार" असं गोकुळ गीते म्हणाले.

विधान परिषदेसाठी घोडेबाजाराच्या चर्चा असताना नाशिकचे उमेदवार गोकुळ गीते यांचा ऑफरबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट
Gokul Geete
| Updated on: Jun 10, 2026 | 10:22 AM

नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. दोन-दोन मंत्री गोकुळ गीते यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते निवडूक लढवण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. गोकुळ गीते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. पण मुख्यमंत्री दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे गोकुळ गीते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. नाशिक विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमदेवार आहेत. ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली आहे. गोकुळ गीते यांनी आज मीडियाशी संवाद साधला.

“काल मी प्रचारात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्या भावाला फोन आला होता. मला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवले होते. आज ते दिल्लीला आहेत. मात्र मी आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीला जायला सांगितलं, तर तिथे जाणं क्रमप्राप्त आहे” असं गोकुळ गीते म्हणाले. “नरेंद्र दराडे यांचे बंधु किशोर दराडे हे गणेश भाऊंच्या घरी गेले होते. मी त्यांची भेट नाकारली. ते गणेश दादा आणि वहिनीला भेटले. आधी बोलायचं आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची ही काही संस्कृती नाही. मी भाजपात सक्रिय नाही. माझे बंधू गणेश गीते भाजपात आहेत. त्यामुळे मी काम करत होतो” असं गोकुळ गीते म्हणाले.”कुणाल दराडेचे वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. माझा बाप काढला. एका व्यक्तीच्या सात पिढ्यांचा उद्धार केला” असं गोकुळ गीते म्हणाले.

मध्यस्थी मार्फ़त प्रलोभने दिली जात आहेत

“दराडे यांना जिंकून आण्यासाठी त्यांना पाठिंबा हवा आहे. माझे आणि गिरीश महाजन यांचे फार काही संबंध नाहीत. पण माझे बंधू गणेश गीते यांचे महाजन यांच्या सोबत जवळचे संबंध आहेत. गणेश गीते हे देखील थांबण्यासाठी सांगत आहेत. गेल्या 8 दिवसापासून मला प्रलोभन येत आहेत. पण मला ते नको आहे, भीक घेणार नाही. मध्यस्थी मार्फ़त प्रलोभने दिली जात आहेत” असा दावा गोकुळ गीते यांनी केला.  विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराच्या चर्चा असताना हा धक्कादायक गौप्यस्फोट म्हणावा लागेल.

माझ्या कामांमुळे अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा

“माझ्याकडे भाजपचं कुठलही पद नाही. गणेश भाऊ 2017 पासून भाजपचे पदाधिकारी आहेत. स्थायी समिती सदस्य होते. मी पडद्यामागे राहून काम करायचो. माझ्या कामांमुळे अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा झाला” असं गोकुळ गीते यांनी सांगितलं.

दराडे यांच्या विरोधात मतदार आहेत

“दराडे यांच्या विरोधात मतदार आहेत. मागच्या सहा वर्षात दराडे यांनी कुठलेही काम केले नाही. आजच्या भेटीत देखील काही मार्ग निघेल अस वाटत नाही. मी तडजोड करणार नाही. इथले जे आमदार आहेत ते निष्क्रिय आहेत. त्यामुळे मतदार मला लढण्यासाठी सांगत आहेत. नेत्यांचा मान राखण्यासाठी मी थांबू शकतो, घरात बसू शकतो पण पाठिंबा देऊ शकत नाही” असं गोकुळ गीते म्हणाले.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us