ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का, आधी 12 आता 10 माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार?; नाशिकचं राजकीय समीकरणच बदलणार?

नाशिक महापालिकेतील सध्याची सदस्य संख्या 133 आहे. नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपचे महापालिकेत 67 नगरसेवक आहेत.

ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का, आधी 12 आता 10 माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार?; नाशिकचं राजकीय समीकरणच बदलणार?
ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का, आधी 12 आता 10 माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार?; नाशिकचं राजकीय समीकरणच बदलणार?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 23, 2022 | 8:53 AM

नाशिक: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्का बसण्यास सुरुवात झाली आहे. आधी 12 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि नाशिकचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गटाचे आणखी 10 नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. तसं झाल्यास ठाकरे गटाकडे 12 नगरसेवकच उरणार आहेत. त्यामुळे नाशिकचं राजकीय समीकरणच बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

नाशिकचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांच्यानंतर ठाकरे गटाचे आणखी 10 माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सिडको, सातपूर, नाशिकरोड विभागातील माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. नागपूर अधिवेशन सोहळ्या दरम्यानच हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाऊसाहेब चौधरी यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यापूर्वी ठाकरे गटाच्या 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे नाशिक महापालिकेतील ठाकरे गटाची सदस्य संख्या 34 वरून 22 झाली होती. आता पुन्हा 10 माजी नगरसेवक ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे नाशिक महापालिकेतील संख्याबळ 34 वरून थेट 12 वर येणार असल्याचं चित्रं आहे.

या दहाही माजी नगरसेवकांचा प्रवेश सोहळा नागपूर अधिवेशना दरम्यानच होणार आहे. मात्र हा प्रवेश कधी आणि कुठे होणार? कुणाच्या उपस्थिती होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला जाणार की हे माजी नगरसेवकच नागपूरला येणार? तसेच प्रवेश करू इच्छिणारे ते दहा नगरसेवक कोण? याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेतील सध्याची सदस्य संख्या 133 आहे. नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपचे महापालिकेत 67 नगरसेवक आहेत. तर शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून शिवसेनेची सदस्य संख्या 34 आहे. आता त्यातून 22 नगरसेवक शिंदे गटात जात असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

या राजकीय घडामोडींमुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधील राजकीय समीकरणे पुरते बदलून जाणार आहे. तसेच ठाकरे गटाला नाशिकमधील आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी या निवडणुकीत सर्वस्व पणाला लावावं लागणार आहे.

महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप 67
शिवसेना 34
काँग्रेस 6
राष्ट्रवादी 6
मनसे 5
इतर 3