नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी, शुभांगी पाटील यांच्याबद्दल गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jan 16, 2023 | 6:54 PM

त्या उद्धव ठाकरे यांच्याकडं गेल्यात. शिवसेनेत प्रवेश करून घेतला. तिथं गळ्यात हार टाकून घेतला. त्यामुळं शुभांगी पाटील यांचा प्रश्न आमच्यासाठी संपला आहे, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट सांगितलं.

नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी, शुभांगी पाटील यांच्याबद्दल गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य
गिरीश महाजन
Follow us on

नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे (Satyajit Tambe) आणि शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही अपक्ष उमेदवारांना कोणत्याही पक्षानं जाहीर पाठिंबा दिलेला नाही. नाशिकमधून मीच ठाकरे गटाची उमेदवार असा दावा शुभांगी पाटील यांनी केला. ठाकरे गटाचा मला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर मला विश्वास आहे, असं शुभांगी पाटील म्हणाल्या. महाविकास आघाडीतील घटकपक्षांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शुभांगी पाटील यांच्याबद्दलच्या भूमिकेनंतर त्या कोणत्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार राहतील, हे स्पष्ट होईल.

तिकिटाचा विचार होणार नाही, असं कोण सांगणार

मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, सुमारे वीस दिवसांपूर्वी त्यांनी आमच्याकडं प्रवेश केला. याला तीन आठवडे झाले असतील. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं की, तिकीटाची खात्री देणार नाही.

तिकीट मिळेल नाही मिळेल, हे आम्ही काही सांगू शकत नाही.तिकीट मिळालं नाही, तर काय, असं त्यांना विचारलं होतं. तेव्हा शुभांगी पाटील यांनी पक्षाचं प्रामाणिक काम करण्याचं आश्वासन दिलं होतं.

शुभांगी पाटील यांचा विषय भाजपसाठी संपला

कोणालाही तिकीटाचा विचार करू असंच सांगणार. तुमचा विचार करणार नाही, असं कोणाला सांगणार, असा सवालही गिरीश महाजन यांनी विचारला. तिकीट न मिळाल्यानं त्यांचं मन बदललं असेल.
त्यामुळं त्या उद्धव ठाकरे यांच्याकडं गेल्यात. शिवसेनेत प्रवेश करून घेतला. तिथं गळ्यात हार टाकून घेतला. त्यामुळं शुभांगी पाटील यांचा प्रश्न आमच्यासाठी संपला आहे, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट सांगितलं.

संजय राऊत यांनी पाठिंबा असल्याचं सांगितलं

संजय राऊत यांनी शुभांगी पाटील या नाशिकमधून शिवसेनेच्या उमेदवार असतील, अस स्पष्ट केलं. त्यामुळं शुभांगी पाटील या आता शिवसेनेकडून उमेदवारी लढतील. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
हे दोन्ही पक्ष उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यानंतरचं शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार राहतील की, शिवसेनेच्या हे स्पष्ट होईल. नाशिकमध्ये अपक्ष सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होईल, असं दिसतं.